The गडविश्व
ता. प्र /कुरखेडा, दि. १३ : तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कुरखेडा येथे भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मदिनानिमित्त ८ ऑगस्ट रोजी शाश्वत शेती दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी तहसीलदार राजकुमार धनबाते होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संवर्ग विकास अधिकारी धिरज पाटील, तालुका कृषि अधिकारी किशोर सरदारे, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय रामटेके, पंचायत समिती विस्तार अधिकारी खांडरे, उप कृषि अधिकारी राजेश पिल्लारे आणि योगेश बोरकर उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे महत्त्व समजावून सांगितले आणि डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या कृषि क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल माहिती दिली. यावेळी प्रगतीशील शेतकरी नरेशचंद्र नाकाडे, वामनराव बावणकर, विलास ढवळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन कृषिसेवक सीमा बोरकर यांनी केले, तर प्रास्ताविक आणि आभार उप कृषि अधिकारी योगेश बोरकर यांनी मानले. कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. शाश्वत शेतीच्या प्रसारासाठी हा कार्यक्रम शेतकऱ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणारा ठरला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkhedanews #gadchirolipolice
