‘देवजी’सह चार बड्या नक्षल्यांची शरणागती : सक्रिय राजकारणाचे संकेत

26

‘देवजी’सह चार बड्या नक्षल्यांची शरणागती : सक्रिय राजकारणाचे संकेत
– नक्षल चळवळीला ऐतिहासिक धक्का
The गडविश्व
हैदराबाद, दि. २४ : प्रतिबंधित कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) संघटनेचे महासचिव आणि सर्वोच्च नेता थिप्पीरी तिरुपती ऊर्फ ‘देवजी’ (६२) यांनी आपल्या तीन वरिष्ठ सहकाऱ्यांसह हैदराबाद येथे पोलिसांसमोर शरणागती पत्करली. चार दशकांहून अधिक काळ भूमिगत राहून संघटनेचा ‘थिंक टँक’ मानल्या जाणाऱ्या देवजीच्या निर्णयामुळे नक्षल चळवळीला मोठा धोरणात्मक धक्का बसल्याचे मानले जात आहे.
देवजीसोबत केंद्रीय समिती सदस्य मल्ला राजी रेड्डी ऊर्फ संग्राम, तेलंगणा राज्य सचिव बडे चोक्का राव ऊर्फ दामोदर आणि राज्य समिती सदस्य नुने नरसिंम्हा रेड्डी ऊर्फ गंगन्ना यांनीही आत्मसमर्पण केले. वाढते वय, प्रकृती अस्वास्थ्य आणि वाढता सुरक्षा दबाव यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत देवजी म्हणाला, “शस्त्रे खाली ठेवली असली तरी आमचा राजकीय विचार संपलेला नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी कायद्याच्या चौकटीत लढा सुरू ठेवू, वेळ पडल्यास सक्रिय राजकारणातही प्रवेश करू.” या विधानामुळे नक्षलवादी विचारांचा राजकीय अवतार पुढे दिसणार का, याबाबत चर्चा रंगली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत ५९१ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली असून राज्यात केवळ ११ सक्रिय सदस्य उरले आहेत. देवजीवर विविध राज्यांत मिळून १० कोटींचे बक्षीस जाहीर होते. मे २०२५ मध्ये सर्वोच्च नेता नंबाला केशव राव (बसवराजू) चकमकीत ठार झाल्यानंतर देवजीकडे सूत्रे आली होती.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद समूळ नष्ट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. देवजीच्या शरणागतीनंतर नक्षल चळवळ नेतृत्वाच्या मोठ्या पोकळीत सापडल्याचे मानले जात असून, सुरक्षा यंत्रणांसाठी हा मोठा मानसिक व धोरणात्मक विजय समजला जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #surrender #MaoistSurrender #DevjiSurrenders #NaxalMovement #CounterInsurgency #HyderabadNews #InternalSecurity #LeftWingExtremism #AmitShah #CPI(Maoist) #BreakingNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here