-विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कडे सोपविले पाठिंब्याचे पत्र
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : केंद्रातील भाजपा सरकार हे ओबीसी विरोधी सरकार असून तेली समाज ओबीसी प्रवर्गात येत असताना आजवर या समाजावर सरकारकडून अन्याय करण्यात आला आहे. तर हुकूमशाही धोरणाने चालणाऱ्या भाजपा सरकारमुळे देशातील संविधान व लोकशाही धोक्यात आली आहे. ती अबाधित राखण्याकरिता आज विदर्भातील १२ तेली समाज संघटनांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची गडचिरोली येथील निवासस्थानी भेट घेऊन इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान व चंद्रपूर- वनी – आर्णी लोकसभा उमेदवार आ. प्रतिभा धानोरकर यांना लेखी पत्रातून पाठिंबा जाहीर केला.
याप्रसंगी प्रामुख्याने विदर्भ तेली महासंघाचे केंद्रीय उपाध्यक्ष धनराज मुंगले, इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान, तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व अन्य मान्यवर तसेच पाठिंबा दर्शविणारे तेली समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या तेली समाजाला आजवर केंद्र सरकारने कुठल्याही कल्याणकारी योजनांचा लाभ दिलेला नाही. तर केंद्रातील व राज्यातील दोन्ही सरकारकडून तेली समाजाची आजवर अवहेलनाच होत आली आहे. देशात भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून केवळ हुकूमशाही धोरण राबवून बहुजन समाजाचा आवाज दाबण्याचे कार्य करीत आहे. यामुळे देशातील लोकशाही व संविधान धोक्यात आल्याची परिस्थिती सर्वत्र निर्माण झाली आहे. देशाचे सर्वांना समान हक्क देणारे संविधान कायमस्वरूपी टिकावे व देशातील लोकशाही अबाधित राहावी याकरिता विदर्भातील तेली समाजाच्या १२ संघटनांनी इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडी यांची हात बळकट करण्यासाठी आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची गडचिरोली निवासस्थानी भेट घेऊन लेखी पत्रातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #loksabhaelection )
