The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : धानोरा तालुक्यातील सर्च संस्थेच्या शोधग्राम येथील माँ दंतेश्वरी रुग्णालयात २५ ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान लॅप्रोस्कोपीद्वारे हिस्टेरेक्टॉमी शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण २७ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
अंडाशयात गाठी असणे, पाळीचे प्रमाण अत्यधिक असणे, गर्भाशयात गोळा किंवा गाठ निर्माण होणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांची या शिबिरासाठी निवड करण्यात आली होती. हे शिबिर मुंबईच्या सुप्रसिद्ध लॅप्रोस्कोपी सर्जन डॉ. नीता वार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. त्यांच्यासह सर्च रुग्णालयाच्या अनुभवी वैद्यकीय व परिचारिका कार्यकर्त्यांच्या सहकार्याने शस्त्रक्रिया प्रक्रियेला यश मिळाले.
ग्रामीण व आदिवासी भागातील गरजू महिलांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मोफत मिळाव्यात या उद्देशाने या शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. सर्व रुग्णांची ऑपरेशनपूर्व आवश्यक प्रयोगशाळा तपासणी, प्रत्यक्ष शस्त्रक्रिया तसेच नंतरची निगा या सर्व सेवा पूर्णतः मोफत देण्यात आल्या.
यासोबतच रुग्ण व त्यांच्यासोबत आलेल्या एक नातेवाईकासाठी निवास व मेसची मोफत सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमामुळे आरोग्यसेवेपासून दूर असलेल्या अनेक महिलांना दिलासा मिळाला असून रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
