धानोराजवळ एसटी बस बंद पडली : महामार्गाचे खड्डे आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर

123

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ८ : गडचिरोली आगाराच्या गोडलवाही एसटी बसने आज प्रवाशांच्या संयमाची परीक्षा घेतली. धानोरा शहराबाहेर, अपुऱ्या नियोजनात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या खड्ड्यांतून मार्ग काढत असताना अचानक बसची लायनर जाम झाली. पाइप फुटल्यामुळे मागची चारही चाकं जाग्यावरच जाम झाली आणि बस मधोमध रस्त्यावर अडकली. यामुळे प्रवाशांना अक्षरशः उकाड्यात रस्त्यावर ताटकळत उभं राहावं लागलं.
हा प्रकार घडताना धानोरा परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि कंत्राटदारांची बेफिकीरी पुन्हा एकदा उजेडात आली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे असून, त्यातून वाहनं काढणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखं झालं आहे.
महत्वाचं म्हणजे, राष्ट्रीय महामार्गाचे काम महिनोनमहिने सुरूच आहे. मात्र त्याचा दर्जा आणि गती याबाबत कोणतीही ठोस जबाबदारी घेतली जात नाही. खड्ड्यांमुळे वाहन उलटण्याचे, अपघात होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. स्थानिक नागरिकांचं कार्यालयीन काम, शाळा-कॉलेजकडचा प्रवास आणि दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झालं आहे.
या घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी आणि स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधित कंत्राटदार व प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त केला आहे. “काम सुरू आहे” या पाट्यांमागे लपून किती दिवस जबाबदारी झटकली जाणार?”, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
या पार्श्वभूमीवर, धानोरा व परिसरातील नागरिकांनी एकमुखाने आवाज उठवत रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची, तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांकडून दिला जात आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here