The गडविश्व
जि.प्र/ गडचिरोली (चेतन गहाणे), दि. ०६ : ग्रामीण मातीतून उगम पावलेली जिद्द आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ माणसाला किती दूर घेऊन जाते, याचा आदर्श ठरली आहे गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील स्नेहा भानारकर. गोंडवाना विद्यापीठातून सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी मिळवलेल्या स्नेहाची प्रतिष्ठित टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS), मुंबई येथे संशोधन अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
स्नेहाच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. अत्यंत दुर्गम भागातून येऊनही तीने शिक्षणात सातत्य ठेवत वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी २७ गावांमध्ये कार्य केलं. तिच्या समर्पित कामामुळे आदिवासी समुदायाच्या हक्कांना नवा आवाज मिळाला आणि त्या अनुभवाच्या जोरावर तिने TISS ची कठीण निवड प्रक्रिया यशस्वीपणे पार केली.
येत्या ७ मे पासून, स्नेहा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय व TISS यांच्या संयुक्त प्रकल्पात सहभागी होऊन आदिवासी समाजाच्या उपजीविका विकासासाठी कार्य करणार आहे. या प्रकल्पाचा केंद्रबिंदू म्हणजे वनाधिकार कायदा आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी, ज्याचा थेट फायदा हजारो कुटुंबांना होणार आहे.
स्नेहाच्या यशाबद्दल गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू, प्राध्यापक, सहकारी विद्यार्थी तसेच संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील समाजकार्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ती केवळ एक विद्यार्थी नाही, तर ग्रामीण भागातील हजारो तरुणांची प्रेरणादात्री बनली आहे.
स्नेहा भानारकरच्या झळाळत्या यशप्रवासाने गडचिरोली जिल्ह्यात सामाजिक परिवर्तनाचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. तिच्या पुढील प्रवासासाठी सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gondwana_university #kurkheda)