मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या : पाच आरोपी अटकेत

66

मांडूळ सापांची तस्करी करणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या : पाच आरोपी अटकेत
– सिंदेवाही वनविभागाची धडक कारवाई
The गडविश्व
सिंदेवाही, दि.११ : वन्यजीव तस्करीविरोधात सिंदेवाही वनविभागाने धडक कारवाई करत अनुसूची-१ मधील संरक्षित ‘मांडूळ’ प्रजातीचे साप जप्त केले असून या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंदवून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपक्षेत्रात वनपरीक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार (बोरावार) यांच्या नेतृत्वाखाली पथक गस्त घालत असताना संशयास्पद हालचालींची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार रत्नापूर नियतक्षेत्रातील हिवराज शामराव गहाणे यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला. घरात प्लास्टिक पिशवीत मांडूळ प्रजातीचे साप आढळून आल्याने वनकर्मचाऱ्यांनी तत्काळ जप्तीची कारवाई केली.
या प्रकरणी अशोक धोडुजी आत्राम (रा. रत्नापूर), ईश्वर दुर्याधन शेंडे (रा. धामनगाव चक, ता. नागभीड), निर्मल अनिल हालदार (रा. नेताजीनगर, ता. चामोर्शी जि. गडचिरोली), सरोज शिबु मालो (रा. सुंदरनगर, ता. मुलचेरा) आणि अनिल गोविंदा मेश्राम (रा. रत्नापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, सिंदेवाही यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
ही कारवाई उपवनसंरक्षक कुमारस्वामी एस. आर. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहायक वनसंरक्षक अरविंद जे. (प्रादेशिक व वन्यजीव) व एम. बी. गायकवाड (तेंदू) यांच्या सहकार्याने तसेच परीविक्षाधीन वनपरीक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक, आरआरयू पथक व वाहनचालकांच्या सहभागातून ही मोहीम यशस्वी करण्यात आली.
वन्यजीव तस्करीला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सुरूच राहणार असल्याचा इशारा वनविभागाने दिला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Sindewahi #ForestDepartment #WildlifeSmuggling #SandBoa #WildlifeProtectionAct #BrahmapuriForest #Chandrapur #Gadchiroli #ForestAction #WildlifeCrime

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here