चकमकीत सहा नक्षलवादी ठार, तीन महिला नक्षलींचा समावेश
– ऑटोमॅटिक शस्त्रे व मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त
The गडविश्व
बीजापूर / विशेष प्रतिनिधी, दि. १२ : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेजवळील बीजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बीजापूर, दंतेवाडा जिल्हा राखीव पोलिस (DRG) आणि विशेष कार्यबल (STF) यांच्या संयुक्त कारवाईत झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले असून त्यामध्ये तीन महिला नक्षलींचा समावेश आहे. दरम्यान या ठिकाणाहून ऑटोमॅटिक शस्त्रे, इन्सास रायफल, स्टेनगन, ३०३ रायफल तसेच मोठ्या प्रमाणात स्फोटक व नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही धडक कारवाई बीजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात करण्यात आली. बीजापूरचे पोलिस अधीक्षक डॉ. जितेंद्र यादव यांनी सांगितले की, सुरक्षा दलाचे एक पथक नक्षलविरोधी कारवाईसाठी इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात दाखल झाले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. सुरक्षा दलाने चोख प्रत्यूत्तर देत सहा नक्षल्यांना ठार केले.
सर्चिंगदरम्यान एक जखमी नक्षली जिवंत अवस्थेत ताब्यात घेण्यात आला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती असून त्याच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
गृहमंत्री विजय शर्मा यांनी सांगितले की, “सरकारने शस्त्र सोडून आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांसाठी सुरक्षित पुनर्वसनाचा मार्ग खुला ठेवला आहे. मात्र, जर त्यांनी हिंसेचा मार्ग निवडला, तर सुरक्षा दल त्यांना योग्य प्रत्युत्तर देतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी चर्चेतील नक्षल कमांडर हिडमा यांची आई माडवी पुंजी आणि नक्षल लीडर बारसे देवा यांची आई बारसे सिंगे यांनीही भावनिक आवाहन केले आहे. “घरी परत ये बेटा, गावातच काम करून जगूया,” असे म्हणत दोन्ही मातांनी आपल्या मुलांना शस्त्र सोडून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #NaxalEncounter #Bijapur #Chhattisgarh #Bastar #PoliceAction #SecurityForces #AntiNaxalOperation














