सिरोंचाचे तहसीलदार निलेश होनमोरे निलंबित ; अवैध वाळू उत्खननावर नियंत्रणात निष्काळजीपणाचा ठपका

51

– शासनाची धडक कारवाई – विभागीय चौकशीचा आदेश
The गडविश्व
गडचिरोली, दि. ७ : सिरोंचा तालुक्याचे तहसीलदार निलेश होनमोरे यांच्यावर शासनाने मोठी कारवाई करत तात्काळ प्रभावाने निलंबनाचा आदेश जारी केला आहे. महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी काढलेल्या आदेशानुसार, होनमोरे यांनी कार्यकाळात अवैध गौण खनिज (वाळू) उत्खनन आणि वाहतूक नियंत्रणात निष्काळजीपणा व दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले असून, त्यांच्या विरोधात गंभीर तक्रारी प्राप्त झाल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन झाल्याचे लक्षात घेता, शासनाने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम, १९७९ अन्वये विभागीय चौकशीची कारवाई सुरू करण्याच्या अधिनतेने निलंबनाची कारवाई केली आहे. महसूल व वन विभागाने आदेश क्रमांक निलंबन-२०२५/प्र.क्र.११०/आस्था-४अ दिनांक ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी करत महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या नियम ४ (१) (अ) नुसार दिलेल्या अधिकाराचा वापर करून निलेश होनमोरे, तहसीलदार, सिरोंचा, जि. गडचिरोली यांना शासन सेवेतून तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आल्याचे नमूद केले आहे.
दरम्यान निलंबन काळात होनमोरे यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे राहील. त्यांनी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या पूर्वसंमतीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये, असे स्पष्ट निर्देश आदेशात देण्यात आले आहेत. तसेच निलंबन काळात त्यांना शासनमान्य नियमांनुसार निलंबन निर्वाह भत्ता मिळेल. मात्र या कालावधीत त्यांनी कोणतीही खाजगी नोकरी, धंदा वा व्यापार करू नये, अन्यथा ते निलंबन भत्त्यास पात्र राहणार नाहीत, अशी अटही आदेशात नमूद आहे.
या निलंबनामुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून, अवैध वाळू उत्खननाविरोधात शासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट संकेत या कारवाईतून मिळत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Suspension #Tehsildar #RevenueDepartment #IllegalMining #Gadchiroli #Sironcha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here