धक्कादायक! एक लाखाचं कर्ज, ७४ लाखांची शिक्षा; सावकारीच्या छळात बळीराजाने कर्जफेडीसाठी विकली किडनी

78

धक्कादायक! एक लाखाचं कर्ज, ७४ लाखांची शिक्षा; सावकारीच्या छळात बळीराजाने कर्जफेडीसाठी विकली किडनी
The गडविश्व
चंद्रपूर- नागभीड, दि. १७ : सावकारी कर्जाच्या अमानुष पाशात अडकलेल्या बळीराजाचे जीवन किती निर्दयपणे उद्ध्वस्त होते, याचा अंगावर काटा आणणारा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात समोर आला आहे. अवघ्या एक लाख रुपयांच्या कर्जाने सुरू झालेला संघर्ष अवाजवी व्याजामुळे तब्बल ७४ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आणि अखेर या कर्जातून सुटका मिळवण्यासाठी एका शेतकऱ्याला स्वतःची किडनी विकण्याचा टोकाचा निर्णय घ्यावा लागला.
नागभीड तालुक्यातील मिंथुर गावातील रोशन सदाशिव कुडे हा अल्पभूधारक शेतकरी केवळ चार एकर शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मात्र निसर्गाच्या अवकृपेने शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. त्यासाठी दोन सावकारांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये असे एकूण एक लाख रुपयांचे कर्ज घेतले.
मात्र दुर्दैवाने खरेदी केलेल्या गायी मरण पावल्या आणि शेतीही पिकली नाही. यानंतर सावकारांकडून अवाजवी व्याजासह वसुलीचा छळ सुरू झाला. कर्जाची रक्कम दिवसेंदिवस वाढत गेली. सावकारांकडून घरात येऊन धमकावणे, अपमानास्पद भाषा आणि मानसिक छळ सहन करावा लागला.
कर्जातून मुक्त होण्यासाठी रोशन कुडे यांनी दोन एकर शेती विकली, ट्रॅक्टर विकला, घरातील मौल्यवान साहित्य विकले; तरीही कर्ज संपले नाही. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या एक लाख रुपयांच्या कर्जावर दिवसाला दहा हजार रुपये व्याज आकारण्यात येत होते, अशी माहिती समोर आली असून त्यामुळे ही रक्कम तब्बल ७४ लाख रुपयांपर्यंत गेल्याचा गंभीर आरोप आहे.
या अमानुष वसुलीला कंटाळून आणि कुटुंबाचे भवितव्य वाचवण्यासाठी अखेर रोशन कुडे यांनी कर्जफेडीसाठी स्वतःची किडनी विकली. ही बाब उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, सावकारी व्यवस्थेची क्रूरता पुन्हा एकदा समोर आली आहे.
या प्रकरणात किशोर रामभाऊ बावनकुळे, लक्ष्मण पुंडलिक उरकुळे, प्रदीप रामभाऊ बावनकुळे, संजय विठोबा बल्लारपुरे, मनीष घाटबांदे आणि सत्यवान राम रतन बोरकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संबंधितांवर सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार तातडीने गुन्हे दाखल करावेत, तसेच पीडित शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदत व वैद्यकीय संरक्षण द्यावे, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून होत आहे.
कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर जात असताना, किडनी विकण्यासारखा निर्णय घेण्याची वेळ येणे हे केवळ एका कुटुंबाचे दु:ख नसून, शासन, प्रशासन आणि सावकारीविरोधी कायद्यांच्या अंमलबजावणीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे. बळीराजाचा हा आक्रोश कधी ऐकला जाणार, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #chandrpurnews #breakingnews #Shocking #FarmerInDebt #UsuryMenace #Chandrapur #KidneyForLoan #DebtTrap #AgrarianCrisis #StopUsury #JusticeForFarmer #HumanityQuestioned

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here