– नक्षलग्रस्त भागातून जिद्दीने गाठले यश
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १८ : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त धानोरा तालुक्यातून एक प्रेरणादायी यशकथा पुढे आली आहे. धानोरा येथील रहिवासी मल्लिक बुधवानी यांची मुलगी कुमारी शिफा बुधवानी हिने तालुक्यातील पहिली चार्टर्ड अकाउंटंट (C.A.) होण्याचा मान पटकावला आहे.
अत्यंत खडतर आणि संघर्षमय प्रवासातून शिक्षण घेतलेल्या शिफाने दुसरीपर्यंतचे शिक्षण गडचिरोली येथील कार्मेल अकॅडमीमध्ये पूर्ण केले. त्या काळात गडचिरोलीला ये-जा करत असताना पांढरसळा गावाजवळ नक्षलवाद्यांनी झाडं पाडून रस्ता बंद केल्याने तिला शिक्षणात व्यत्यय आला. त्या परिस्थितीत तिला गडचिरोलीतच आत्या कडे थांबावं लागलं.
पुढे तिच्या वडिलांनी तिला महाबळेश्वर येथील १९४५ साली स्थापन झालेल्या नामवंत शाळेत प्रवेश दिला. याच शाळेत बॉलिवूडचे कलाकार रवीना टंडन आणि आमिर खान यांचेही शिक्षण झाले होते. साध्या परिस्थितीतून आलेल्या शिफाचे आई-वडील ट्रेनने पुण्यापर्यंत प्रवास करत आणि तिथून टॅक्सीतून मुलीला शाळेत घेऊन जात. आसपासचे श्रीमंत लोक आलिशान गाड्यांमध्ये येत असतानाही, शिफाने कोणताही न्यूनगंड न बाळगता आपली जिद्द कायम ठेवली.
तिने दहावीत ९८% आणि बारावीत ९२% गुण मिळवत मेरिट यादीत स्थान पटकावले. पुढे सिंबायोसिस कॉलेज, पुणे येथून B.Com चे शिक्षण घेत असतानाच तिने C.A. परीक्षा उत्तीर्ण केली.
शिफा सांगते, “माझे आईवडील हेच माझे खरे परमेश्वर आहेत. त्यांच्यामुळेच हे यश मिळवता आले. माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीच्या वेळी त्यांनी मला धीर दिला. आज मी ज्या उंचीवर आहे, त्याचे श्रेय पूर्णपणे त्यांनाच जाते.”
नक्षलग्रस्त भागातून आलेल्या एका मुलीने चार्टर्ड अकाउंटंटसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करत तालुक्याचे नाव उज्वल केल्याने सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे. शिफा बुधवानी आज अनेकांसाठी प्रेरणास्थान बनली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora news #ShifaBudhwani #DhanoraPride #FirstCA #GadchiroliSuccess #InspirationFromNaxalRegion #GirlPower #CharteredAccountant #SuccessStory #शिफा_बुधवानी #धानोरा_गौरव #चार्टर्डअकाउंटंट #नक्षलग्रस्त_यशोगाथा #गडचिरोली #महिला_यश #विदर्भ_गौरव
