– महिलांनी न घाबरता तक्रार नोंदवा : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
The गडविश्व
चंद्रपूर, दि. ०९ : कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत ‘कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३’ लागू करण्यात आलेला आहे. या अधिनियमाच्या अंमलबजावणी साठी पीडित महिलेस ऑनलाईन स्वरूपात तक्रार नोंदवता यावी याकरिता मंत्रालयाने ‘शी बॉक्स’ नावाचे संकेतस्थळ सुरू केले असून https://shebox.wcd.gov.in या पत्त्यावरून तक्रार सादर करता येते.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांनी ही वेब लिंक त्यांच्या कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, तसेच सदर दाव्याबाबत अधिकृत माध्यमांतून जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने दिल्या आहेत. कामाच्या ठिकाणी १० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असतील, तर अशा आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे कायद्याने बंधनकारक आहे. संबंधित महिलांनी अशा ठिकाणी झालेल्या लैंगिक छळाची तक्रार ही समितीकडे करावी. मात्र, जर आस्थापनात १० पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत असतील किंवा तक्रार थेट नियोक्त्याविरुद्ध असेल, तर ती जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समितीकडे दाखल करावी लागते.
या अधिनियमामध्ये नमूद केलेल्या कलम २६ नुसार जर कोणत्याही आस्थापनाने अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही, तसेच कलम १३, १४ आणि २२ नुसार आवश्यक कार्यवाही न केली, अथवा अधिनियमातील व नियमांतील तरतुदी व जबाबदाऱ्या पाळल्या नाहीत, तर संबंधित मालकास पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. याच प्रकाराची पुनरावृत्ती झाल्यास त्या आस्थापनाचा परवाना रद्द होणे किंवा दुप्पट दंड आकारला जाणे, अशी तरतूदही आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘शी बॉक्स’ हे पोर्टल अत्यंत उपयुक्त असून पीडित महिलांनी या पोर्टलचा लाभ घेऊन स्वतःच्या हक्कांचे रक्षण करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर यांनी केले आहे.

#SheBox #WomenSafety #POSHAct2013 #Chandrapur #WCDIndia #महिला_सुरक्षा #तक्रार_पोर्टल