सिरोंचातील सिरीअल चोर गजाआड ; ११ चोरीचे गुन्हे उघड, २.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

452

The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा परिसरात मागील काही काळात झालेल्या एकामागून एक चोरीच्या घटनांना अखेर ब्रेक लागला आहे. स्थानिक पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाच आरोपीकडून तब्बल ११ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून, २,५१,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल व प्रभारी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली. सिरोंचा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोनि. समाधान चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने विशेष तपास मोहीम राबवली.
दिनांक ९ मे रोजी, मपोउपनि प्रांजली कुलकर्णी रात्रगस्तीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आकाश नागया कोत्तापेल्ली (वय २०, रा. कोत्तापेल्ली, ता. सिरोंचा) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पोलिस स्टेशनमध्ये आणून सखोल चौकशी केली असता त्याने सिरोंचा व असरअल्ली परिसरातील ११ ठिकाणी चोर्‍या केल्याची कबुली दिली.
त्यानुसार पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून इलेक्ट्रॉनिक वस्तू, सिव्हील कामाचे साहित्य, कपडे, मोबाईल फोन्स आदींचा समावेश असलेला २.५१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
आरोपीवर सिरोंचा पोलिस ठाण्यात आधीपासून सात गुन्ह्यांची नोंद असून तो सराईत चोर असल्याचेही तपासात स्पष्ट झाले. त्याला १० मे रोजी पहाटे अटक करून न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. कोठडी दरम्यान आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक, उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक, तसेच पोस्टे सिरोंचा प्रभारी अधिकारी समाधान चव्हाण यांच्या नेतृत्वात पोउपनि. मारोती नंदे, पोउपनि. ज्ञानेश्वर धोत्रे, नरेंद्र वांगाटे, प्रांजली कुलकर्णी, लावण्या जक्कन यांच्यासह संपूर्ण पोलिस पथकाने केली.
सदर कारवाईमुळे सिरोंचा परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here