– सहा जण जखमी
The गडविश्व
इंदूर, १८ ऑगस्ट : मध्य प्रदेशातील इंदूर शहरात शुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणानंतर मोठा वाद उफाळून आल्याने रात्री उशिरा एका सुरक्षा रक्षकाने परवानाधारक बंदुकीने अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना पुढे येत आहे. या गोळीबारात दोन जण जागीच ठार झाले तर सहाजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी (MP Police) आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे. या दुहेरी हत्याकांडानंतर शहरात घबराट पसरली आहे.
इंदूरच्या खजराना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णा बाग कॉलनीत रात्रौ ११ वाजता एका सुरक्षा रक्षकाचा कुत्र्याला फिरवण्याच्या क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी वाद झाला होता. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सुरक्षा रक्षकाने परवाना असलेल्या बंदुकीतून दणादण गोळ्या झाडल्या. या गोळीबारात शेजारी राहणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच कुटुंबातील सहा जण जखमी झाले असून, यामध्ये दोन महिला गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी आरोपी राजपाल सिंगला अटक केली असून त्याच्याकडून परवाना असलेली बंदूक जप्त केली आहे. मृतांमध्ये राहुल (२८) आणि विमल (३५) त्यांचा समावेश आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सुरक्षा रक्षक राजपाल कुत्र्याला फिरवत होता. त्याचवेळी दुसरा कुत्रा आला आणि दोघांमध्ये भांडण सुरू झाले. राहुलच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतल्यानंतर वाद वाढला. भांडण वाढल्याने राहुलच्या कुटुंबातील बाकीचे लोकही बाहेर आले. त्यानंतर संतापलेल्या सुरक्षा रक्षकाने घराकडे धाव घेतली आणि बंदूक घेऊन तो पहिल्या मजल्यावर पोहोचला. तेथून त्याने राहुल, विमल यांच्या कुटुंबीयांवर गोळीबार केला. यामध्ये राहुल आणि विमल यांचा जागीच मृत्यू झाला. तर कुटुंबातील सहाजण जखमी झाले. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागले. राहुल आणि विमल यांना गंभीर अवस्थेत एमवाय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. ज्योती (३० ) पती राहुल, सीमा (३६) पती सुखराम, कमल (५०) वडील कडवा, मोहित (२१०) वडील भीम सिंग, ललित (४०) वडील नारायण बोरसे आणि प्रमोद हे सर्व एमवायएचमध्ये दाखल आहेत.
