– विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा जिवंत अनुभव
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २१ : धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात सत्र २०२५-२६ साठी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक १८ जुलै रोजी उत्साहात पार पडली. या निवडणुकीचे खास आकर्षण म्हणजे विद्यार्थी प्रतिनिधींची निवड ही ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) द्वारे लोकशाही पद्धतीने करण्यात आली.
या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना गुप्त मतदान प्रणालीचे महत्त्व आणि लोकशाही मूल्यांची जाणीव करून देण्यात आली. निवडणूक अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या निवडणुकीत तेरा पदांसाठी एकूण ३० अर्ज दाखल झाले होते. मतदान हॉलमध्ये विद्यार्थ्यांनी ओळखपत्र दाखवून व बोटावर शाई लावून मतदान केले.
मतमोजणी १९ जुलै रोजी सकाळी आठ वाजता पार पडली. निकालानुसार विपश्य रितेश मशाखेत्री यांची शाळेच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली. उपमुख्यमंत्रीपदासह स्वच्छता, महिला, सांस्कृतिक, क्रीडा, पर्यावरण व पोषण आहार मंत्रीपदासाठी निवड झालेल्या इतर विद्यार्थ्यांनाही शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजय सूरजुसे होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक प्रशांत साळवे, डॉ. रश्मी डोके, प्रशांत तोटावार, रजनी मडावी, शंकर रत्नागिरी व प्रा. विजय बुरमवार उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेचे संचालन ओमप्रकाश देशमुख यांनी केले, तर आभार मोहन देवकते यांनी मानले.
मतदान व्यवस्थेसाठी अशोक कोल्हटकर, रेखा कोरेवार, प्रियंका आनंदवार, दशमुखे मॅडम, कोहळे मॅडम, शेंडे सर, कीर्ती शिंगरूपवार मॅडम, देवेंद्र भालेराव व यामिनी चूधरी यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.
शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची बीजे रोवणारी ही निवडणूक शिक्षणाचा एक प्रेरणादायी प्रयोग ठरला.

#thegdv #thegadvishva #धानोरा #शालेयनिवडणूक #ईव्हीएममतदान #लोकशाहीशिक्षण #गडचिरोली #शाळामंत्रिमंडळ #विद्यार्थीप्रतिनिधी #शैक्षणिकघटना #ZPHSchool #DemocracyInSchool