‘ व्यंग शरीरात नाही, मनात असते ; सन्मानाने जगणेच खरे सामर्थ्य’
– कोरचीत जागतिक दिव्यांग दिन व स्त्री-हिंसा विरोधी पंधरवडा उत्साहात
The गडविश्व
ता.प्र/ कोरची, दि. ०४ : ‘व्यक्तीचा व्यंग हा शरीरात नसून मनात असतो. न्यूनगंड बाजूला ठेवून आत्मविश्वासाने आणि सन्मानाने आयुष्य जगले, तर दिव्यांगत्व अडथळा राहत नाही,’ असे प्रतिपादन कोरचीचे तहसीलदार प्रशांत गड्डम यांनी जागतिक दिव्यांग दिन व स्त्री-हिंसा विरोधी पंधरवडा कार्यक्रमात केले. कवर समाज सभागृहात हा कार्यक्रम अग्निपंख दिव्यांग संघटना आणि ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
प्रशांत गड्डम यांनी दिव्यांग दिनाचा इतिहास, उद्देश आणि उपलब्ध हक्कांची माहिती देत कोरची तालुक्यातील कोणताही दिव्यांग शासन योजनांपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही दिली. ‘दिव्यांगांनी हातपाय नसतील तर मनगट मजबूत करा, आत्मविश्वास ठेवा, समाजात नावलौकिक करणे शक्य आहे,’ असे त्यांनी सांगितले.
संगायो योजना प्रमुख ज्योती गोंधळे यांनी 15 सप्टेंबर 2025 च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग व वयोवृद्धांच्या मानधनात वाढ करून 1500 रु वरून थेट 2500 रु देण्यात आल्याची माहिती दिली आणि त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता कशी करायची याचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात नायब तहसीलदार ज्योती गोंधळे, पोलीस निरीक्षक शैलेश ठाकरे, दिव्यांग हक्क व पुनर्वसन समन्वयक संगीता तुमडे, कुमारीताई जमकातन, शशिकला दरवडे, महेंद्र बोपचे, इजामसाय काटेंगे, सन्नु मडावी, तिजनताई जेठूमल आणि महेश लाडे उपस्थित होते. दिव्यांग बांधव, स्तनदा माता, महाग्रामसभा पदाधिकारी, ग्रामसभा प्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कुमारीताई जमकातन यांनी सांगितले की, संघटनेतर्फे आतापर्यंत 45 दिव्यांगांना प्रमाणपत्रे, 10 जणांना संजय गांधी योजनांचा लाभ आणि 25 दिव्यांगांना व्यवसायासाठी मदत देण्यात आली आहे. स्त्री-हिंसा विरोधी पंधरवडा 2006 पासून साजरा केला जात असून महिलांवरील अत्याचार, विशेषतः डिजिटल हिंसा रोखण्यासाठी जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संगीता तुमडे यांनी दिव्यांगांसाठी उपलब्ध हक्क, पुनर्वसन, प्रशिक्षण, क्षमता वृद्धी आणि सामाजिक समावेशकतेवर सविस्तर मार्गदर्शन केले. ‘दिव्यांग व्यक्तीला सहानुभूती नको, सन्मान हवा. संधी मिळाली तर ते सर्वच क्षेत्रांत सामान्यांच्या तुलनेत अधिक सक्षम व प्रामाणिकपणे काम करतात,’ असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमात स्तनदा मातांना बेबी किटचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद भोयर यांनी केले तर आभार पवन मेश्राम यांनी मानले. यशस्वी आयोजनासाठी महेश लाडे, दर्शना, सुवर्णा, प्रभा, देवबत्ती, अमिता आणि अग्निपंख दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














