चिंगलीत स्वच्छतेचा खेळखंडोबा ; नागरिक त्रस्त
– कागदावर विकास, प्रत्यक्षात घाण आणि गैरकारभार
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०४ : तालुक्यातील चिंगली ग्रामपंचायत सध्या स्वच्छतेच्या बाबतीत पूर्णतः अपयशी ठरल्याचे चित्र समोर आले असून, गावात सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. पंचायत राज म्हणजे ग्रामीण विकासाचा कणा असतो, मात्र चिंगलीत ही व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवले जात असताना, चिंगली ग्रामपंचायत मात्र या अभियानाला हरताळ फासत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ग्रामपंचायत अधिकारी महिन्यातून एखाद-दोन वेळाच गावात हजर राहत असल्याने प्रशासन आणि नागरिकांमधील समन्वय तुटलेला आहे. परिणामी विकासकामे ठप्प असून गैरकारभाराला खतपाणी मिळत आहे.
कचरा व्यवस्थापन कोलमडले
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायतीला घंटागाडी, इलेक्ट्रॉनिक गाडी यांसारखी साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र या साधनांचा योग्य वापर होत नसल्याने गावातील मुख्य चौक, प्रमुख रस्ते, बसस्थानक परिसरात कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसून येत आहेत. यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था
गावातील सार्वजनिक शौचालये वापरण्यायोग्य नसून अनेक ठिकाणी साफसफाईअभावी दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. देखभाल दुरुस्ती पूर्णतः दुर्लक्षित असल्याने महिलांसह ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
योजनांचा लाभच नाही
ग्रामपंचायत अधिकारी गावात राहत नसल्याने शासनाच्या अनेक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. पात्र असूनही अनेक नागरिकांना लाभ मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तक्रार करायची तरी कुणाकडे? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
अधिकारी गैरहजर, वेतन मात्र नियमित?
ग्रामपंचायत अधिकारी नियमित हजर राहत नसताना त्यांचे वेतन कसे निघते, याबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेने लक्ष द्यावे
चिंगली ग्रामपंचायतीतील स्वच्छतेचा खेळखंडोबा, योजनांचा बोजवारा आणि प्रशासनाची हलगर्जीपणा पाहता, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














