देसाईगंजातील रेती तस्करी प्रकरण तापले ; ३०० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडीकडे तक्रार
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : देसाईगंज उपविभागातील रेतीघाटांवर कंत्राटाच्या आड नियमबाह्य उत्खनन करून सुमारे ३०० कोटी रुपयांच्या रेतीची तस्करी व आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या प्रकरणाची सक्तवसुली संचालनालय (ईडी) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी पश्चिम क्षेत्रीय विशेष संचालक, ईडी यांच्याकडे लेखी तक्रार करून केली आहे.
जराते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिज शाखेने ९ मे २०२६ रोजी देसाईगंज उपविभागातील आमगाव, कुरुड, चोप, शंकरपूर, रामपूर चक, वैरागड, वघाळा, अरसोडा आणि मोहझरी येथील रेतीघाटांमधून ९८ हजार ९४० ब्रास रेती उपसा व वाहतुकीची परवानगी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील मे. ए.बी. कॅरियर्स डायनॅमिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिली होती. मात्र संबंधित कंपनीने जिल्हा खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तसेच देसाईगंज व आरमोरी येथील तहसीलदार यांच्या संगनमताने सहा लाख ब्रासपेक्षा अधिक रेतीचे अवैध उत्खनन करून नागपूर, अमरावती, यवतमाळसह विविध भागात त्याची विल्हेवाट लावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
शेकडो जेसीबी, पोकलेन व अन्य यंत्रसामग्रीच्या साहाय्याने रात्रंदिवस अवैध उत्खनन व वाहतूक करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी वारंवार विरोध करूनही संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला संरक्षण दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यापूर्वी ४ जून २०२६ रोजी विभागीय आयुक्त, नागपूर यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार करण्यात आली होती. मात्र राज्यातील एका प्रभावशाली मंत्र्याचा या प्रकरणाशी संबंध असल्याने कोणतीही कारवाई झाली नसल्याचा दावाही जराते यांनी केला आहे.
तक्रारीनुसार, एकट्या वघाळा रेतीघाटावरूनच सुमारे दीड लाख ब्रास रेतीचा उपसा करण्यात आला आहे. या अवैध कामादरम्यान एका मजुराचा वाहनाखाली दबून मृत्यू झाल्याची घटनाही घडली असून, अनियंत्रित उत्खननामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे शासनाचे किमान ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात संबंधित कंत्राटदार, जिल्हा खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधितांच्या आर्थिक व्यवहारांची ईडीमार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाई रामदास जराते यांनी केली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













