धानोरा तालुक्यातील स्थानिक वापरासाठी वाळू उपलब्ध : सालेभट्टी रेतीघाट नागरिकांसाठी खुला
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २१ : धानोरा तालुक्यातील नागरिकांना शासकीय बांधकामे, विभागीय प्रकल्प तसेच घरकुल बांधणीसाठी आवश्यक वाळू कमी दरात आणि कायदेशीर मार्गाने मिळावी, यासाठी शासनाच्या वाळू निर्गती धोरण 2025 अंतर्गत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या धोरणानुसार सालेभट्टी येथील रेतीघाट स्थानिक वापरासाठी राखीव ठेवण्यात आला असून, तालुक्यातील नागरिकांना वाळूचा पुरवठा पारदर्शक प्रक्रियेद्वारे सुरू करण्यात आला आहे.
सालेभट्टी रेतीघाटातून स्थानिकांना 600 रुपये प्रति ब्रास दराने वाळू उपलब्ध करून देण्यात येत असून, यासोबत जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीचा 10 टक्के व इतर अनुदेय शुल्क आकारण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाला कमाल पाच ब्रासपर्यंत वाळू घेण्याची मर्यादा लागू आहे. विशेष बाब म्हणजे शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वाळूसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन ठेवण्यात आली असून, नागरिकांनी mahakhanij.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवरून 29 ऑक्टोबर 2025 ते 31 मे 2026 या कालावधीत अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी अर्जदार सेतू केंद्र, नागरिक सुविधा केंद्र किंवा मोबाईल फोनचा वापर करून नोंदणी करू शकतात. मंजूर झालेला वाहतूक पास थेट अर्जदाराच्या व्हॉट्सअॅपवर पाठवला जात असून, GPS बसविलेल्या वाहनांनाच वाळू वाहतुकीची परवानगी आहे. वाहतूक सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत करता येणार आहे.
या उपक्रमामुळे तालुक्यातील बांधकाम कामांना गती मिळणार असून, वाळू तस्करीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. कायदेशीर पुरवठ्यामुळे नागरिकांना महागडे आणि अवैध मार्गांवरील अवलंबित्व कमी होणार असून, शासनाच्या महसूलातही वाढ होण्याची अपेक्षा आहे. धानोरा तालुका प्रशासनाने या योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या असून, स्थानिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanoranews














