धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित पिककर्ज उपलब्ध करून द्या

46

– दुर्गापूर ग्रामपंचायतीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने पिककर्ज देण्याची मागणी
The गडविश्व
ता. प्र /धानोरा, दि. ०४ : खरीप हंगाम भरात असताना धानोरा तालुक्यातील अनेक शेतकरी अद्यापही पिककर्जापासून वंचित असून, परिणामी शेतीसाठी आवश्यक साधनसामग्री खरेदी करणे त्यांच्यासाठी अशक्य झाले आहे. याच पार्श्वभूमीवर दुर्गापूर ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना तातडीने पिककर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
४ ऑगस्ट २०२५ रोजी तहसीलदार धानोरा यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोलीला पाठवलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, धानोरा तालुका अति दुर्गम भाग असून बँकिंग सुविधा अत्यंत मर्यादित आहेत. तरीही शेतकऱ्यांनी २०२५-२६ सालासाठी पिककर्जासाठी महिन्यांपूर्वीच अर्ज सादर केले, परंतु आजतागायत त्यांच्या खात्यात कर्जरक्कम जमा झालेली नाही.
शेतकरी सध्या धान लागवडीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र, नांगरणी, चिखल तयार करणे, खते, औषधे यासाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने शेतीचे काम थांबण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अनेक शेतकरी सावकारांच्या दारात जाण्याच्या विवंचनेत सापडले आहेत.
दुर्गापूर ग्रामपंचायतीने यासंदर्भात तातडीने चौकशी करून संबंधित शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून, शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here