चाळण झालेल्या रस्त्यांची प्राधान्याने दुरुस्ती करा : आमदार रामदास मसराम
कुरखेडा येथे कुरखेडा–कोरची तालुका स्तरीय आढावा बैठक
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि.०५ : तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक रस्ते अक्षरशः चाळण झाले असताना संबंधित यंत्रणांकडून मात्र सुस्थितीत असलेल्या रस्त्यांचीच वारंवार दुरुस्ती प्रस्तावित केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. ही बाब चुकीची असून बांधकाम विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून जी रस्ते अत्यंत बकाल अवस्थेत आहेत, त्यांची प्राधान्यक्रमाने दुरुस्ती व बांधकाम प्रस्तावित करावी, असे स्पष्ट निर्देश आमदार रामदास मसराम यांनी दिले.
पंचायत समिती कार्यालय, कुरखेडा येथील सभागृहात मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी आमदार मसराम यांच्या अध्यक्षतेखाली कुरखेडा व कोरची तालुक्याची संयुक्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते.
बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सिंचन, आरोग्य, पंचायत, महिला व बालकल्याण, कृषी आदी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अनेक ठिकाणी पूल व रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास येताच आमदार मसराम यांनी संबंधित विभागप्रमुखांना जाब विचारला. रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत कंत्राटदारांना तंबी देऊन सर्व प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.
बैठकीस कुरखेडा तहसीलदार राहुल पाटील, कोरची तहसीलदार प्रशांत गड्डम, गट विकास अधिकारी धिरज पाटील (कुरखेडा), गट विकास अधिकारी राजेश फाये (कोरची), काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, धनपाल मिसार, माजी जि. प. सदस्य प्रभाकर तुळावी, माजी नगरसेवक उस्मान खान, भावेश मुंगणकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
तालुक्यातील पायाभूत सुविधांमध्ये गुणवत्तापूर्ण व वेळेत सुधारणा व्हावी, यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, अशी अपेक्षाही आमदार मसराम यांनी यावेळी व्यक्त केली.














