चातगावात आज पोलीस ठाण्याचे लोकार्पण ; 110 पदांनी वाढणार सुरक्षा दलाची ताकद
The गडविश्व
गडचिरोली/मुंबई, दि. १४ : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षिततेचा नवा अध्याय सुरू होत असून, धानोरा तालुक्यातील चातगाव येथे नव्या पोलीस ठाण्याचे आज औपचारिक लोकार्पण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या ठाण्यासाठी शासनाने 110 नवीन पदांना मंजुरी दिल्याने सुरक्षा यंत्रणेची ताकद दुपटीने वाढणार आहे.
मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून या ठाण्याची उभारणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नक्षलग्रस्त प्रतिमा बदलून विकासाचे नवे मार्ग खुले करण्यासाठी सक्षम आणि सशक्त सुरक्षा व्यवस्था उभारण्याचे प्रयत्न राज्य सरकार सातत्याने करीत आहे. चातगाव पोलीस ठाणे हा त्याचाच एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार, चातगाव परिसरातील ५० हून अधिक गावे या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येतात. संवेदनशील भौगोलिक स्थितीमुळे या भागातील सुरक्षा नेहमीच आव्हानात्मक राहिली आहे. नवीन पोलीस ठाणे सुरू झाल्याने आता गस्त वाढविणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि नक्षलविरोधी कारवाया अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य होणार आहे.
स्थानिक नागरिकांसाठीही ही सुविधा मोठा दिलासा ठरणार आहे. तात्काळ मदत, वेगवान पोलीस प्रतिसाद आणि न्यायप्रक्रिया यामुळे नागरिकांचा आत्मविश्वास वाढून पोलीस-जनता संवाद अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
चातगावात आज सुरू होणारे नवीन पोलीस ठाणे हे गडचिरोलीतील शांतता, सुरक्षितता आणि विकासाच्या दिशेने घेतलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Chatgav #PoliceStation #Inauguration #Security #Maharashtra #DevendraFadnavis #NaxalAffectedArea #GadchiroliPolice #Development














