धानोऱ्यात पाईपलाइन फुटली, पाण्याअभावी नागरिक हैराण
– प्रशासनाचे दुर्लक्ष
The गडविश्व
ता. प्र /धानोरा, दि. १५ : शहरात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे खोदकामादरम्यान अनेक ठिकाणी पाणीपुरवठ्याची पाईपलाइन फुटली आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प झाला असून, मागील १४ दिवसांपासून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
महत्वाचे म्हणजे, नगरपंचायत प्रशासन आणि कंत्राटदाराने या गंभीर समस्येकडे केलेले दुर्लक्ष नागरिकांच्या नाराजीस कारणीभूत ठरत आहे. पाण्यासाठी महिलांना हातपंपांवर लांबच लांब रांगा लावाव्या लागत असून, शहरात भीषण जलसंकट निर्माण झाले आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना योग्य नियोजनाअभावी पाइपलाइन फुटल्याने पाणीपुरवठा थांबविण्यात आला. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा प्रशासन करत असले तरी पाइपलाइन दुरुस्त करण्यासाठी कुठलाही तत्पर प्रयत्न दिसून येत नाही.
धानोऱ्यात आधीच जलसंकट गंभीर बनले असताना, ही बेपर्वाई नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या समस्येवर अन्याय करणारी आहे. नागरिकांनी तात्काळ पाइपलाइन दुरुस्ती करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात त्वरित लक्ष घालावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.
