कुरखेडातील ११ पानठेल्यांवर दंडात्मक कारवाई 

1

कुरखेडातील ११ पानठेल्यांवर दंडात्मक कारवाई 
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : कुरखेडा शहरातील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात तसेच विविध ठिकाणी पानटपऱ्यांमधून तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत असल्याची माहिती मिळताच प्रशासन आणि मुक्तीपथ यांच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई केली. कोटपा कायद्यानुसार ११ जणांवर कारवाई करत एकूण २ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
सुगंधित तंबाखूचे दुष्परिणाम पाहता शासनाने विक्रीवर बंदी आणली असली तरी, पानटपऱ्यांवर खर्रा, सिगारेट, तंबाखू आणि इतर पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचे आढळून आले. सतत वाढत असलेल्या तंबाखू सेवनामुळे युवकांपासून महिलांपर्यंत अनेक जण या व्यसनात गुरफटले आहेत. तंबाखूचे सेवन केल्याने कर्करोग, हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे विकार, छातीतील दुखणे अशा गंभीर आजारांचा धोका वाढतो.
तंबाखूजन्य पदार्थ विक्रीविरोधात शहरात मोहिम राबविण्यात आली. यावेळी संबंधित ठिकाणी जाऊन पथकाने मुद्देमाल जप्त करून दंडात्मक कारवाई केली. मोहिमेत ग्रामीण रुग्णालयातील NCD विभागाच्या निशा चचाने (समुपदेशक), रश्मी मोगरे (लॅब टेक्निशियन), पोलिस स्टेशनचे PSI आघाव व सहकारी, नगर पंचायतचे समीर नंदेश्वर तसेच मुक्तीपथ कार्यालयाचे शारदा मेश्राम (संघटक), जीवन दहिकर (प्रेरक), अतुल पोरटे (स्पार्क कार्यकर्ता) यांनी सहभाग नोंदविला.
संयुक्त कारवाईमुळे शहरातील शैक्षणिक परिसरात तंबाखू विक्रीवर आळा बसण्यास मदत होणार असून, पुढील काळातही अशीच तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here