– खासदार डॉ. किरसान यांची संसदेत ठाम मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही काँग्रेस सरकारने सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना असून, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यास ती उपयुक्त ठरली आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या अनेक मजुरांचे मजुरीचे हप्ते थकीत आहेत. त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी संसदेत थकीत हप्ते तातडीने देण्याची मागणी केली. तसेच, शेतात खोदलेल्या सिंचन विहिरींसाठीचे थकीत हप्तेही तत्काळ द्यावेत, अशी त्यांनी आग्रही मागणी केली.
मनरेगा अंतर्गत दरवर्षी 100 दिवस रोजगाराची हमी देण्याचे आश्वासन दिले जाते, मात्र प्रत्यक्षात केवळ 50% दिवसच रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे मजुरांना पूर्ण 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याची प्रभावी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी खासदार डॉ. किरसान यांनी संसदेत केली.
