– कौशल्य विकास आणि करिअर मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना लाभ
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाणे) दि. २२ : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (मॉडेल करिअर सेंटर) गडचिरोली आणि श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय, कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार समुपदेशन सत्र नुकतेच उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून वनश्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयदेव देशमुख उपस्थित होते. उपप्राचार्य पी. एस. खोपे, डॉ. अभय साळुंखे, समन्वयक डॉ. गुणवंत वडपल्लीवार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
प्राचार्य डॉ. मुनघाटे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना सांगितले की, कोणतेही काम हे लाजिरवाणे नसते. आपल्या जिल्ह्यातील खनिजसंपत्ती आणि आगामी औद्योगिक प्रकल्पांमुळे रोजगाराच्या संधी वाढणार असून, त्या संधींचा लाभ घेण्यासाठी तरुणांनी कौशल्य आत्मसात करावे. स्वतःच्या कष्टातून मिळवलेले उत्पन्न हेच खरे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आपल्या मुलीचे उदाहरण देत, ऑस्ट्रेलियात शिक्षण घेतल्यानंतरही तिने मेहनतीने काम करणे स्वीकारले, हेही नमूद केले.
डॉ. जयदेव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सांगितले की, “ध्येय निश्चित करून प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही.” करिअर म्हणजे केवळ पैसे मिळवणे नव्हे, तर समाजासाठी काही देणे हेदेखील महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
डॉ. अभय साळुंखे यांनी महाविद्यालयातील विविध शैक्षणिक व स्पर्धात्मक उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गुणवंत वडपल्लीवार यांनी, सूत्रसंचालन डॉ. संजय महाजन यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. रवींद्र विखार यांनी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी, इतर संस्थांचे विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सहाय्यक आयुक्त योगेश शेंडे व कौशल्य विकास सहाय्यक अधिकारी सुरेश नंदावार यांचे विशेष सहकार्य लाभले.
#thegadvishva #thegdv #gadchirolipolice #gadchirolinews
#कौशल्यविकास #स्वयंरोजगार #करिअरमार्गदर्शन #गडचिरोली #मुनघाटेमहाविद्यालय #विद्यार्थ्यांसाठीप्रेरणा #पंडितदीनदयालउपाध्याय #रोजगारसंधी #शिक्षणविकास #ग्रामविकास
#SkillDevelopment #SelfEmployment #CareerGuidance #Gadchiroli #StudentEmpowerment #EmploymentOpportunities #EducationInitiative #PanditDeendayalUpadhyay #ModelCareerCentre #YouthDevelopment
