The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ११ : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत तब्बल ३ कोटी ५ लाख रुपयांचा धान खरेदी घोटाळा उघडकीस आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि तीन संचालकांना अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार मुरलीधर बावणे आणि व्यवस्थापक महेंद्र मेश्राम अद्याप फरार आहेत.
कुरखेडा पोलिसांनी १० मे रोजी अध्यक्ष पतिराम कोकोडे, उपाध्यक्ष पंढरी दादगाये आणि संचालक भाऊराव कवाडकर, नुसाराम कोकोडे व भीमराव शेंडे यांना ताब्यात घेतले. आज (११ मे) या पाचही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, मुख्य आरोपी मेश्राम व बावणे फरार असून पोलिसांचा शोध सुरू आहे.
या घोटाळ्यात २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन हंगामांत १०,००० क्विंटल धान आणि ३४,६०१ रिकामे बारदाने गायब झाल्याचे उघड झाले आहे. मेश्राम यांनी निरक्षर आदिवासी शेतकऱ्यांचे ७/१२ उतारे वापरून बनावट बिले तयार केली. शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणारी रक्कम स्वतःच्या खात्यात वळवली गेल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळे निष्पाप शेतकऱ्यांवर चौकशीचा बडगा उगारला गेला असून परिसरात संतापाचे वातावरण आहे.
या प्रकरणी १९ एप्रिल रोजी बावणे, विपणन अधिकारी सी.डी. कासारकर, एच.व्ही. पेंदाम व इतर १७ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी दोन विपणन अधिकाऱ्यांना अटक करून त्यांना चंद्रपूर कारागृहात न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे. बावणे व मेश्राम यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असला, तरी पोलिसांच्या हरकतीमुळे तो प्रलंबित आहे. बावणे यांना २१ एप्रिल रोजी निलंबित करून मुख्यालय नंदूरबारला हलवण्यात आले आहे.
या घोटाळ्यामुळे सहकारी संस्थांच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शेतकऱ्यांच्या हक्कांवर घाला घालणाऱ्या या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पोलिस तपासाअंती आणखी नावे उघडकीस येण्याची शक्यता असून, फरार आरोपी लवकरच गजाआड जातात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
