मेंढा (लेखा) येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचा उत्साहात समारोप
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १४ : राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत आयोजित सात दिवसीय विशेष शिबिराचा मेंढा (लेखा) येथे उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित श्री जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे महाविद्यालय यांच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल ५० स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेत विविध सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या राबवले.
शिबिरादरम्यान ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, जलसंवर्धन, आरोग्य जनजागृती तसेच सामाजिक प्रबोधन यांसारख्या उपक्रमांवर विशेष भर देण्यात आला. स्वयंसेवकांनी श्रमदानातून गावातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करून ग्रामस्थांना स्वच्छतेचा ठोस संदेश दिला. पर्यावरण संवर्धन व पाणी बचतीबाबतही जनजागृती करण्यात आली.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गणेश चुदरी होते. प्रमुख पाहुण्या म्हणून सरपंच नंदाताई दुगा उपस्थित होत्या. सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रवीण गोहणे, सदाशिव दुगा (पोलीस पाटील), बाजीराव नरोटे, डॉ. किरमिरे, डॉ. जंबेवार, डॉ. चौहान आणि डॉ. झाडे यांचीही उपस्थिती लाभली.
यावेळी एका स्वयंसेवकाने मनोगत व्यक्त करताना सांगितले, “या शिबिरामुळे आम्हाला गावाच्या समस्या जवळून समजल्या. स्वच्छता, पाणी बचत आणि पर्यावरण संरक्षणाबाबत लोकांमध्ये जागृती करता आली, याचा आनंद आहे. समाजासाठी कार्य करताना जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रियंका पठाडे यांनी केले. संचालन गौरव सोनुले व यामिनी सोनुले यांनी केले, तर आभार प्रदर्शन यामिनी सोनुले यांनी मानले. कार्यक्रमाला गावातील नागरिक, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरामुळे गावात स्वच्छता व सामाजिक जागरूकतेचा सकारात्मक संदेश पोहोचल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.














