– आम आदमी पार्टीकडून नगर परिषदेला तातडीच्या उपाययोजनेसाठी निवेदन
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, २९ : देसाईगंज शहरात डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू व मलेरियासारख्या घातक आजारांचा धोका गंभीर स्वरूप धारण करत असून, या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने पुढाकार घेत नगर परिषद प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनेसाठी निवेदन सादर केले.
शहराध्यक्ष आशिष दादाजी घुटके यांच्या नेतृत्वात व महासचिव दीपक नागदेवे यांच्या उपस्थितीत हे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी महिला आघाडी अध्यक्ष शिल्पा बोरकर, संघटन मंत्री वामन पगाडे, सदस्य आशिष कोवे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात, संपूर्ण शहर परिसरात डासांचे प्रमाण भयावह पातळीवर पोहोचले असून, नागरिकांमध्ये डेंग्यू-मलेरियाबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, असे नमूद करण्यात आले आहे. प्रभावी फवारणी, नाले व गटारांची नियमित स्वच्छता, नागरिकांमध्ये जनजागृती, तसेच वैद्यकीय सुविधा वाढवण्याच्या मागण्या निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या.
यावेळी बोलताना आशिष घुटके म्हणाले, “नागरिकांचे आरोग्य हे आमच्यासाठी सर्वोच्च असून, जर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही तर आम आदमी पार्टी तीव्र आंदोलन छेडेल.” महासचिव दीपक नागदेवे यांनीही, “या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास जनतेचा रोष उफाळून येईल,” असा इशारा दिला.
या निवेदनामुळे स्थानिक प्रशासनावर कारवाईचा दबाव निर्माण झाला असून, नागरिकांमध्ये लवकर उपाययोजना होण्याची अपेक्षा आहे. आम आदमी पार्टीने समस्येच्या समाधानासाठी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले असून, येत्या काही दिवसांत नगर परिषद काय पावले उचलते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #डासप्रादुर्भाव #देसाईगंज #आमआदमीपार्टी #डेंग्यूमलेरियाधोका #नगरपरिषदनिवेदन #आरोग्यसंकट #जनतेचीमागणी #AAPDesaiganj #स्वच्छतेसाठीसंग्राम
