– जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आदेश ; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, ०२ : गडचिरोली जिल्ह्यात पावसाळा तोंडावर आला असून काही प्रमुख महामार्गांवर अपघातांची शक्यता आणि अपूर्ण विकासकामांमुळे निर्माण होणाऱ्या धोका लक्षात घेता, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सिरोंचा-आलापल्ली आणि कुरखेडा-कोरची या दोन महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतुकीवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.

सिरोंचा–आलापल्ली मार्गावर जड वाहनांस बंदी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353-C वरील सिरोंचा ते आलापल्ली मार्ग सध्या जड वाहनांच्या वाहतुकीने गजबजलेला असतो. मात्र, पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब होत असल्याने आणि अपघातांची शक्यता लक्षात घेऊन, 5 जून 2025 च्या मध्यरात्रीपासून ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत या मार्गावर सर्व प्रकारच्या जड वाहनांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
या काळात सिरोंचा–आलापल्ली दरम्यानच्या जड वाहनांसाठी मंचेरियाल–राजुरा–बल्लारशाह–चंद्रपूर–गडचिरोली हा पर्यायी मार्ग वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आलापल्लीहून मंचेरियालकडे जाणाऱ्यांसाठी आष्टी–बल्लारपूर–मंचेरियाल मार्गाचा अवलंब करण्यास सांगण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, आपत्कालीन सेवा, आरोग्य, पाणीपुरवठा, पोलीस, अन्न-औषध, वीज, दूरसंचार, रस्ते दुरुस्ती आणि प्रवासी वाहतूक सेवा यांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.
कुरखेडा–कोरची मार्गासाठी पर्यायी व्यवस्था
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 543 वरील कुरखेडा ते कोरची मार्गावर सती नदीवरील पूरबुडीत जुन्या पुलाजवळ नवीन पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. सध्या वाहतुकीसाठी वळण रस्ता वापरला जात आहे. मात्र पावसाळ्यात हा वळण रस्ता पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्यामुळे, 4 जून 2025 च्या मध्यरात्रीपासून ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत वाहतूक पूर्णपणे पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत –
कुरखेडा–आंधळी फाटा–वाघेडा–मालदुगी–गोठणगाव फाटा
कुरखेडा–तळेगाव–खेडेगाव–अंतरगाव–पुराडा
जड वाहनांसाठी मार्ग –
कुरखेडा–वडसा–आरमोरी–वैरागड–गोठणगाव फाटा
कडक अंमलबजावणीसाठी यंत्रणा सज्ज
या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित तहसिलदार, पोलीस विभाग, परिवहन विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना आवश्यक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. मार्गावर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील सूचनाफलक लावण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर असून, वाहतूक नियमनासाठी पोलीस विभागाकडून आवश्यक मनुष्यबळ व बॅरेकेडींग करण्यात येणार आहे.
तसेच, तहसिलदार आणि पोलीस निरीक्षकांनी आठवड्याला संयुक्त अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावेत, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
कायदेशीर कारवाईचा इशारा
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायदा 1988, भारतीय दंड संहिता 1860, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हा प्रशासनाचे आवाहन
वाहतूकदार, वाहनचालक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासनाने सुचवलेले पर्यायी मार्ग वापरून सहकार्य करावे, सुरक्षितता आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन प्रशासनाशी सहकार्य करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी पंडा यांनी केले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #kurkhedanews #korchi #sironcha )