The गडविश्व
गडचिरोली दि. १४ : देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जात आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून गडचिरोली जिल्हा प्रशासनाने आज मॅरेथॉन स्पर्धा आणि जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला.
सकाळी आयोजित या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात जिल्हा परिषदेपासून झाली. जिल्हाधिकारी पंडा यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉनला सुरुवात केली. मॅरेथॉनचा मार्ग जिल्हा परिषद ते एलआयसी चौक, आयटीआय चौक असा होता आणि पुन्हा जिल्हा परिषदेजवळ येऊन त्याची सांगता झाली. या मॅरेथॉनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह अतिरिक्त मुख्य कार्यकार अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, समाज कल्याण अधिकारी चेतन हिवंज तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते.
या मॅरेथॉनसोबतच नागरिक आणि विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाविषयी जनजागृती करण्यासाठी एक भव्य रॅली काढली. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या मॅरेथॉन व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #harghartiranga)
