गडचिरोलीत मोठा घातपात उधळला ; ५ जहाल माओवादी हत्यारांसह ताब्यात

1819

The गडविश्व
गडचिरोली, दि. २०: गडचिरोली जिल्ह्यात विध्वंसक कारवाया करण्याच्या तयारीत असलेल्या पाच जहाल माओवादींच्या मोठ्या कटाचा गडचिरोली पोलिस व सीआरपीएफ ने वेळीच पर्दाफाश करत, त्यांना हत्यारांसह ताब्यात घेतले. यामध्ये दोन महिला माओवादींसह एकूण पाच जणांचा समावेश असून, त्यांच्याजवळून एक एसएलआर, एक .303 रायफल, तीन सिंगल शॉट रायफल्स, दोन भरमार बंदुका आणि तीन वॉकीटॉकी संच जप्त करण्यात आले आहेत. या पाचही माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने एकूण ३६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
ही कारवाई भामरागड उपविभागातील लाहेरी पोलिस उपपोस्टे हद्दीतील बिनागुंडा जंगल परिसरात करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सुमारे ५०-६० माओवादी घातपाताच्या उद्देशाने त्या भागात जमले होते. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सि-60 दलाच्या आठ पथकांसह सीआरपीएफच्या ३७ बटालियनची ए कंपनीने संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. १९ मे रोजी सकाळी बिनागुंडा गावात शिताफीने घेराव घालून शोध घेतला असता, काही संशयित व्यक्ती हत्यारांसह सापडल्या. गावात सामान्य नागरिक असल्याने गोळीबार टाळून पोलिसांनी पाच माओवाद्यांना जिवंत ताब्यात घेतले.तपासादरम्यान उंगी मंगरु होयाम ऊर्फ सुमली (डीव्हीसीएम), पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी (पीपीसीएम), देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता (सदस्य), तसेच इतर दोन प्लाटून सदस्य. उंगी व पल्लवी यांना अटक करण्यात आली. यांच्यावर अनुक्रमे १६ व ८ लाखांचे, तर देवे कोसा पोडीयामवर ४ लाखांचे बक्षीस होते. उर्वरित दोघांवर मिळून ८ लाखांचे बक्षीस जाहीर होते. यापैकी तिघांना अटक करण्यात आली असून इतर दोन संशयितांच्या वयाबाबत खात्री नसल्याने त्यांना बाल न्याय मंडळासमोर सादर करण्यात येणार आहे.
या कारवाईदरम्यान काही माओवादी जंगलाचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी यानंतर माओवादविरोधी अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले असून, माओवादींना हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले आहे.
ही यशस्वी कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजय शर्मा, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सि-60 दल व सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने पार पाडली. जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत एकूण १०३ माओवादींना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलाला यश आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here