महाराष्ट्र हादरला : भीषण विमान अपघात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू
The गडविश्व
बारामती, दि. २८ : राज्याच्या राजकारणाला हादरवून टाकणारी दुर्घटना आज (२८) घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खासगी विमानाला बारामतीजवळ लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे. या घटनेची बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून राजकीय व प्रशासकीय वर्तुळात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज बारामती दौऱ्यावर येणार होते. त्यासाठी मुंबईहून बारामतीकडे त्यांचा प्रवास सुरू होता. मात्र मुंबई ते बारामती हा प्रवास त्यांच्या आयुष्याचा अखेरचा प्रवास ठरला.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी अजित पवार यांच्या विमानाने मुंबईहून उड्डाण घेतले होते. सुमारे ४० मिनिटांच्या प्रवासानंतर हे विमान बारामती विमानतळ परिसरात दाखल झाले. लँडिंगच्या अंतिम टप्प्यात असताना वैमानिकाने विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला; मात्र त्याच निर्णायक क्षणी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. परिणामी विमानावरील नियंत्रण सुटले आणि विमान धावपट्टीवरून काही अंतर दूर जाऊन जोरात क्रॅश झाले.
सूत्रांच्या माहितीनुसार, इंजिनमध्ये बिघाड, नियंत्रण यंत्रणेत तांत्रिक अडथळा किंवा दिशाभूल यापैकी एखाद्या कारणामुळे हा अपघात घडला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तथापि, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी तपास सुरू असून तांत्रिक बाबी, हवामानाची स्थिती आणि इतर संभाव्य कारणांचा सखोल अभ्यास केला जात आहे. तपास यंत्रणांच्या मते ‘ब्लॅक बॉक्स’ हाती आल्यानंतरच या दुर्घटनेचे अचूक कारण स्पष्ट होणार आहे.
या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई येथील पीएसओ हेड कॉन्स्टेबल विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, को-पायलट कॅप्टन संभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच अनेक मंत्री, आमदार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पक्षनेते बारामतीच्या दिशेने रवाना झाले असून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी व प्रभावी नेतृत्व अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने राज्यभरातून शोकसंदेशांचा वर्षाव होत असून ही दुर्घटना राज्यासाठी मोठी शोकांतिका ठरली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #AjitPawar #PlaneCrash
#Baramati #MaharashtraNews #BreakingNews #DeputyChiefMinister #AviationAccident
#PoliticalNews #StateInShock #TragicIncident
#BlackBoxInvestigation #IndianPolitics














