अवैध दारुसाठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई ; 14.47 लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैध दारू विक्रीस आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जाफराबाद (ता. सिरोंचा) येथे छापा टाकून तब्बल 14,47,680 किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे.
गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी संदिप देवाजी दुर्गम याने विक्रीसाठी विदेशी दारूचा मोठा साठा करून ठेवला असल्याची खात्री पटताच काल (दि. २७ सप्टेंबर) पोलिस पथकाने धाड घातली. पोलिस पाहताच आरोपी पळून गेला. मात्र घराची झडती घेतली असता 11,136 नग ऑफीसर चॉईस (90 मिली) सिलबंद बॉटल आढळून आल्या. प्रत्येकी अंदाजे 130 रुपयांच्या किंमतीने हा मुद्देमाल 14 लाखांहून अधिक किमतीचा असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी उपपोस्टे बामणी येथे आरोपी संदिप देवाजी दुर्गम (रा. जाफराबाद) याच्याविरुद्ध कलम 65(ई) महा. दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून तो फरार आहे. त्याचा शोध सुरु असून पुढील तपास पोउपनि. शाहु दंडे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि. विकास चव्हाण, पोहवा प्रेमानंद नंदेश्वर, पोअं. निशिकांत अलोने व चापोअं. गणेश वाकडोपवार यांनी ही धडक कारवाई पार पाडली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #sironcha














