“कर्जमाफी, धान बोनस, लाडकी बहिण – सर्वच आश्वासनांची फसवणूक” ; अनिल देशमुखांचा गडचिरोलीत भाजप सरकारवर घणाघात

100

The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : “सत्ता येताच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू – हे केवळ निवडणुकीत दिलेले खोटे आश्वासन होते का?”, असा थेट सवाल करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज गडचिरोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी केलेली आश्वासने पाळली नसून शेतकरी, महिला आणि कंत्राटदार यांची सर्रास फसवणूक सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

शेतकऱ्यांची आत्महत्या आणि सरकारची असंवेदनशीलता

पत्रकार परिषदेत बोलताना देशमुख म्हणाले की, “राज्यातील शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालले आहेत. गेल्या दोन वर्षांत ६१२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यात एकट्या विदर्भातील ३ हजार शेतकरी आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर सभांमध्ये दिलेली संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केवळ ढोंग ठरली आहे. सत्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची भावना खेळवली गेली.”

धान खरेदीत अन्याय, बोनस फक्त कागदावरच

धान खरेदीवरूनही देशमुखांनी सरकारला धारेवर धरले. “एकीकडे सरकारने प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याचा आदेश काढलेला असताना, दुसरीकडे अनेक अधिकृत केंद्रांवर विक्री केलेल्या शेतकऱ्यांनाही अद्याप बोनस मिळालेला नाही. हेक्टरी बोनस जाहीर करायचा आणि त्याची अंमलबजावणी करताना नियम बदलायचे – हे दुटप्पी धोरण आहे,” असे त्यांनी खवळून सांगितले.

खते मिळत नाहीत, कंपन्यांची लुट सुरू

देशमुखांनी खते उपलब्ध नसल्याच्या तक्रारीवरही आवाज उठवला. “धान उत्पादक भागात डि.ए.पी व युरिया खतांचा तुटवडा असून, कंपन्या जबरदस्तीने लिंकींग करून इतर वस्तू विकत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी लुट होत आहे आणि कृषी खातं मात्र कंपन्यांऐवजी केंद्रांवर खापर फोडत आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

‘लाडकी बहिण’ योजना म्हणजे फसवणुकीचा नमुना

“लाडकी बहिणींना २१०० रुपये देण्याचे निवडणुकीत आश्वासन देणारे सरकार सत्तेत आल्यावर गप्प का? आजही बहिणींना फक्त १५०० रुपयेच मिळाले आहेत. इतकेच नव्हे तर राज्यात १४ हजार पुरुषांनी या योजनेचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे,” अशी माहिती देत त्यांनी सरकारवर फसवणुकीचा आरोप केला.

कंत्राटदारांचे थकीत बिले आणि आत्महत्या

विविध विकासकामांचे बिले मिळाले नसल्यामुळे राज्यातील कंत्राटदार आर्थिक खाईत लोटले गेले आहेत. “९० हजार कोटींची बिले थकीत आहेत. गडचिरोलीत ३५ वर्षीय कंत्राटदार हर्षल पाटील याने आत्महत्या केली, त्याला एक कोटी ४० लाखांचे बिले मिळाले नाहीत. यावर सरकारचा एक मंत्री म्हणतो ‘तो कंत्राटदारच नव्हता’! ही असंवेदनशीलता म्हणजेच भाजपाचे खरे सरकार,” अशी संतप्त टीका देशमुख यांनी केली.

कायदा-सुव्यवस्था कोलमडली – सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी बिनधास्त
राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे नमूद करत देशमुख म्हणाले, “सत्ताधारी आमदार सामान्य जनतेला मारहाण करतात, गुन्हेगार सर्रास फिरतात, महिलांवर अत्याचार वाढले आहेत. अशा परिस्थितीतही सरकार गप्प बसले आहे. गुन्ह्यांत सत्ताधाऱ्यांची नावे आघाडीवर आहेत.”

“लोकशाहीला काळा डाग”: देशमुख

देशमुख म्हणाले, “ही परिस्थिती केवळ लोकशाहीची विटंबना नाही, तर ती राज्यातील जनतेच्या जीवावर उठलेली धोरणात्मक फसवणूक आहे. याचे उत्तर सरकारने द्यायलाच हवे.”
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #Gadchiroli #AnilDeshmukh #FarmersSuicide #LoanWaiverPromise #PaddyBonusScam #LadkiBahinScheme #FertilizerShortage #ContractorSuicide #PendingBillsCrisis #BJPGovernmentCriticism #LawAndOrderFailure #RisingCrime #PoliticalAttack #PressConferenceGadchiroli
#गडचिरोली #अनिलदेशमुख #शेतकरीआत्महत्या #कर्जमाफीकधी #धानबोनसफसवणूक #लाडकीबहिणींचीफसवणूक #खततुटवडा #कंत्राटदारआत्महत्या #विकासकामांचेथकीतबिल #भाजपसरकारवरटीका #कायदासुव्यवस्था #गुन्हेगारीवाढ #राजकीयआरोप #पत्रकारपरिषदगडचिरोली
#गडचिरोली #अनिलदेशमुख #शेतकरीकर्जमाफी #धानबोनस #लाडकीबहिणफसवणूक #विकासकामांबाबतबिलथकित #गुन्हेगारीराज्य #राजकीयहल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here