– सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष कायम
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १५ : धानोरा–पेंढरी मार्गावरील चव्हेला गावात मोरीवर निर्माण झालेला जीवघेणा खड्डा नागरिकांच्या जिवाला धोका ठरत आहे. या गंभीर प्रकाराची माहिती संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी देण्यात आली असतानाही, अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यामुळे ग्रामस्थांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
चव्हेला गावाच्या मुख्य रस्त्यावर, मोरीच्या बांधकामावरच मध्यभागी मोठा खड्डा पडलेला असून, तो गेल्या कित्येक दिवसांपासून असुरक्षित अवस्थेत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. 2, गडचिरोली येथील कार्यकारी अभियंत्यांना ग्रामपंचायतीमार्फत दोन महिन्यांपूर्वीच पत्र देण्यात आले होते. मात्र आजतागायत कोणतीही दुरुस्ती किंवा खड्डा बुजवण्याचे काम हाती घेण्यात आलेले नाही.
या खड्ड्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, वाहनधारकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. लहान वाहने, दुचाकीस्वार आणि शालेय वाहने या मार्गावरून जात असल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढलेला आहे.
या पार्श्वभूमीवर, ग्रामस्थांनी मोरीचे बांधकाम तात्काळ नव्याने करून सदर खड्डा बुजवण्याची मागणी केली आहे. तसेच यासंदर्भात उपविभागीय अभियंता, जिल्हा परिषद उपविभाग धानोरा यांना निवेदन देण्यात आले असून, त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanoranews #latestnews )