कुरखेडा : अवैध रेती उत्खननाला कोणाचा आशीर्वाद? कारवाई मात्र ठप्प
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २२ : तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीचे प्रकार उघडपणे सुरू असताना प्रशासनाची कारवाई मात्र ठप्प असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे ‘अवैध रेती उत्खननाला कोणाचा आशीर्वाद?’ असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तालुक्यातील विविध नदीपात्रांतून रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर व ट्रकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. काही घाटांवर अधिकृत परवानगी व ई-लिलाव असला तरी नियमांचे उल्लंघन करून मर्यादेपेक्षा अधिक उत्खनन होत असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकारांवर महसूल विभागाकडून ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याने संशय अधिक गडद होत आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, महसूल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कथित संरक्षणामुळे अवैध रेती व्यवसायाला खतपाणी मिळत असल्याची चर्चा जोर धरत आहे. स्थानिक पातळीवर या अधिकाऱ्याला ‘वसुली किंग’ अशी उपाधी दिली जात असल्याचे बोलले जात असले, तरी संबंधित व्यक्तीचे नाव वा अधिकृत पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत.
जिल्ह्यातील इतर भागांत विशेषतः सिरोंचा अवैध रेती प्रकरणी महसूल अधिकाऱ्यांवर निलंबनासारखी कठोर कारवाई झाल्याची उदाहरणे आहेत. मात्र कुरखेड्यातील परिस्थिती मात्र वेगळीच असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम व संताप व्यक्त होत आहे.
रेती घाटांची जबाबदारी महसूल विभागाची असताना कारवाई ठप्प का? जर संरक्षणच मिळत असेल, तर कायद्याची अंमलबजावणी कशी होणार? असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने गोपनीय चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, अवैध उत्खननामुळे पर्यावरणीय हानी, नदीपात्रांची झपाट्याने होत असलेली झीज आणि शासन महसुलाला बसणारा फटका याबाबतही चिंता व्यक्त होत आहे. कारवाईला वेग न मिळाल्यास कुरखेड्यातील रेती माफियांचा प्रभाव आणखी वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
या प्रकरणातील घडामोडींवर आमचा पाठपुरावा सुरू असून, पुढील अपडेट लवकरच…
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolipolice #kurkhedanews














