The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाणे) दि. ०३ : तालुक्यातील अंगारा येथील त्रिभुवन तुकाराम बाळबुद्धे यांनी न्यायालयीन आदेश असूनही वारसा हक्क नाकारला जात असल्याच्या निषेधार्थ ३० जूनपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. न्यायाच्या प्रतीक्षेत आणि प्रशासकीय मनमानीविरुद्ध त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवले असून, ३ जुलै रोजी पत्रपरिषद घेऊन आपली व्यथा मांडली.
बाळबुद्धे यांनी सांगितले की, त्यांच्या बाजूने न्यायालयाचा स्पष्ट निर्णय असतानाही तलाठी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांनी संगनमत करून फसवणूक केली. मृत्युपत्रातील मालमत्ता लपवून खोट्या फेरफारांची नोंद केली गेली असून, खारीज झालेल्या निर्णयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. त्यांच्या म्हणण्यानुसार, २४ डिसेंबर २०२४ रोजी अपील दाखल केल्यानंतरही उपविभागीय कार्यालयाने त्यावर अद्याप काहीही निर्णय दिला नाही. त्यामुळे उपोषणाशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचे त्यांनी सांगितले.
बाळबुद्धे यांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांविरोधात फसवणूक, खोटी नोंद, वारसा हक्कावर अन्याय, आणि मानहानीचे गंभीर आरोप केले असून, नुकसानभरपाईसह तात्काळ मालमत्तेचा ताबा देण्याची मागणी केली आहे. तंटामुक्ती समितीनेही कोणताही तोडगा न काढता कोर्टात जाण्याचा सल्ला दिला, मात्र खर्चासाठी कोणतीही मदत दिली नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, तहसीलदार कुरखेडा यांनी बाळबुद्धे यांच्या अर्जाला उत्तर देत, २८ जून रोजी पत्र काढून न्यायालयीन निर्णयानुसार कायदेशीर प्रक्रियेला सहकार्य करण्याचे आणि उपोषण थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, बाळबुद्धे यांनी उपोषण मागे घेतलेले नाही. स्थानिक नागरिकांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून, प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या आंदोलनामुळे प्रशासकीय कार्यपद्धती आणि न्यायप्रक्रियेवर नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews #कुरखेडा #अमरणउपोषण #त्रिभुवनबाळबुद्धे #प्रशासकीयदुर्लक्ष #वारसाहक्क #गडचिरोली #न्यायआंदोलन #तंटामुक्तीसमिती #तहसीलदार #SDOOffice #मराठीबातमी #जनआक्रोश