The गडविश्व
गडचिरोली, दि.०९ : दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने “आम्ही आमच्या आरोग्यासाठी” या संस्थेच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यात तीन दिवसीय निवासी शेळीपालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांतील दहा तालुक्यांमधून आलेल्या एकूण 29 दिव्यांग सहभागींसाठी हे प्रशिक्षण 3 ते 5 जून 2025 दरम्यान राणी दुर्गावती प्रशिक्षण केंद्र, येरंडी येथे घेण्यात आले. प्रकल्प व्यवस्थापक मनोज मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण यशस्वीपणे पार पडले.
शिबिराची सुरुवात संस्थेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या संगीताताई तुमडे यांच्या सखोल मार्गदर्शनाने झाली. त्यांनी दिव्यांग व्यक्तींचे हक्क, शासकीय योजना, संघटनांचे महत्त्व आणि सामाजिक समावेशन यावर प्रकाश टाकला. त्यानंतर सामाजिक उद्यमशिलता विकास कार्यक्रमाचे विषय सहयोगी अमिर तुराळे यांनी व्यवसायाचे महत्त्व अधोरेखित केले.
पशुधन तज्ञ डॉ. नरेश कांबळे यांनी शेळीपालनातील विविध तांत्रिक बाबींचे सविस्तर प्रशिक्षण दिले. शेळ्यांची निवड, गोठा व्यवस्थापन, चारा योजना, लसीकरण, जंत निर्मूलन, नोंदवही ठेवणे, विमा योजना इत्यादी महत्त्वाच्या बाबी त्यांनी उलगडून सांगितल्या. पशुधन पर्यवेक्षक लक्ष्मण लंजे आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत सुकारे यांनी शेळ्यांच्या आरोग्य व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले.
डॉ. कपिल कोरेटी यांनी चारा व खाद्य व्यवस्थापन तसेच शासकीय योजनांची माहिती दिली. तर आकाश जनबंधू (संगती शेतकरी उत्पादक कंपनी लि.) आणि मार्केटिंग तज्ञ मोहित चौधरी यांनी व्यवसायाचे मार्केटिंग, दस्तावेज व बाजारपेठेतील संधी याविषयी माहिती दिली. शेवटी, विमा प्रतिनिधी जोगींद्र सहारे यांनी शेळी विम्याचे महत्त्व व दावे प्रक्रिया समजावून सांगितली.
या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे दिव्यांग व्यक्तींना स्वबळावर उभे राहण्याची प्रेरणा मिळाली असून, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व तालुका समन्वयक, दिव्यांग बांधव व संस्थेचे कार्यकर्ते यांनी मोलाचे योगदान दिले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews )