कुरखेडा : आदिवासी वसतीगृहात स्नेहसंमेलन व निरोप समारंभ उत्साहात
– विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
The गडविश्व
ता.प्र /कुरखेडा, दि. ०५ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, कुरखेडा येथे स्नेहसंमेलन व निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमानिमित्त गीत गायन, भाषण, वकृत्व, फॅशन शो तसेच नृत्य (डान्स) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध कला-कौशल्यांचे सादरीकरण करत कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरेंद्रकुमार कोकोडे, विस्तार अधिकारी, पंचायत समिती कुरखेडा होते. उद्घाटन नायब तहसीलदार राजकुमार धनबाते यांनी केले, तर सहउद्घाटक म्हणून प्रेमदास पंधरे, पोलीस पाटील, धमदीटोला उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून शुभदा देशमुख (संस्था – आम्ही आमच्या आरोग्यासाठी, कुरखेडा), भा. द. निंबेकर (उपकोशागार, कुरखेडा), घनश्याम हूलके (मुख्याध्यापक, प्रीती आदिवासी आश्रम शाळा, आरमोरी), मतीन शेख (गृहपाल, शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह, मालेवाडा), सुनील मिसार (मुख्याध्यापक, सोनसरी), तेजस मेश्राम (गृहपाल, कुरखेडा) तसेच अश्विनी काटेखाये (गृहपाल, आदिवासी मुलींचे वसतीगृह, कुरखेडा) यांची उपस्थिती लाभली.
अध्यक्षीय भाषणात नरेंद्रकुमार कोकोडे यांनी आदिवासी विकास विभागामार्फत वसतीगृहांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक व मूलभूत सोयी-सुविधांचा योग्य वापर करून जीवनात यशस्वी होण्याचे आवाहन केले. यशस्वी आदिवासी व्यक्तिमत्त्वांची उदाहरणे देत विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा संदेश त्यांनी दिला. प्रमुख अतिथी शुभदा देशमुख यांनी विद्यार्थ्यांची वागणूक सुसंस्कृत, शिस्तबद्ध व सामंजस्यपूर्ण असावी, असे मार्गदर्शन केले. इतर मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मोलाचे विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहा गजभिये यांनी केले. सूत्रसंचालन समीक्षा पिंपळे व साहिल काटंगे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार गृहपाल तेजस मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नीलकंठ मोटघरे, नेहा गजभिये, करणकुमार शेंद्रे, वसंतराव कुडमेथे, राकेश हलामी (विद्यार्थी प्रतिनिधी), शितल कोवाची (विद्यार्थिनी प्रतिनिधी) व देवेंद्र धोंडने यांनी विशेष सहकार्य केले.
स्नेहसंमेलन व निरोप समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, आत्मविश्वास व आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.














