कुरखेडा : सती नदीपात्रातून वाळूची लूट, शासकीय शाळेसाठीच अवैध वाळूचा वापर?
– दंडाच्या कारवाईनंतरही कुरखेड्यात माफियांची मस्ती कायम
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि.२४ : तालुक्यातील नान्ही वाळू घाट प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल १.४६ कोटी रुपयांचा दंड ठोठावत कारवाईचा बडगा उगारला होता. त्या कारवाईची धूळ खाली बसण्याआधीच कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथे सती नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, दिल्लीस्थित ‘द युनिक एंटरप्राइजेस’ या बांधकाम कंत्राटदाराने शासनाकडून कोणतीही अधिकृत परवानगी न घेता व महसूल न भरता सती नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केल्याची माहिती समोर येत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून हा उपसा सर्रास सुरू असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगू लागली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, हा अवैध वाळू उपसा गेवर्धा ग्रामपंचायत हद्दीत गुरनोली गावालगत सुरू असलेल्या एकलव्य निवासी शाळा प्रकल्पासाठी केल्याचे समोर येत आहे. शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या बांधकामासाठीच बेकायदेशीर वाळू वापरली जात असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुख्य मार्गालगत उघड्यावर साठवलेली वाळू, अवजड वाहनांची वर्दळ आणि खुलेआम सुरू असलेला उपसा हे सर्व महसूल यंत्रणेच्या नजरेआड कसे राहिले? की ‘वरिष्ठांच्या सूचनेवरून’ दुर्लक्ष केले जात आहे? असा सवाल उपस्थित होत असून स्थानिक सूत्रांचे म्हणणे आहे की तहसील कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या मौन संमतीशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन होणे अशक्य आहे.
नान्ही प्रकरणात फक्त कंत्राटदारावर दंड ठोठावण्यात आला मात्र संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. परिणामी, ‘दंड भरा आणि पुन्हा उत्खनन करा’ अशीच पद्धत सुरू असल्याची जोरदार टीका नागरिकांतून होत आहे.
सुमारे १०० कोटी रुपयांच्या प्रस्तावित बांधकामासाठी अवैध वाळू वापरण्याचे धाडस केवळ संगनमताशिवाय शक्य नसल्याचाही आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. शासनाचा महसूल बुडवून, पर्यावरणाची हानी करून आणि कायद्याला हरताळ फासून चाललेला हा खेळ थांबवणार कोण? असा संतप्त सवाल यानिमित्त गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक नागरिकांनी तातडीने संयुक्त पंचनामा करून संपूर्ण साठा जप्त करावा, महसूल वसुली करावी आणि वाळू धोरण २०२५ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
आता प्रशासन खरोखरच कारवाईचा बडगा उगारणार की पुन्हा एकदा ‘मौन’ बाळगणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews #IllegalSandMining #KurKheda #Gadchiroli #SandMafia #RevenueLoss #CorruptionWatch #EklavyaSchool #RiverLoot #MaharashtraNews #EnvironmentalCrime














