कुरखेडा : क्रीडा महोत्सवात महसूल कर्मचारी व्यस्त, वाकडी घाटावर रेती माफियांचा धुमाकूळ

29

कुरखेडा : क्रीडा महोत्सवात महसूल कर्मचारी व्यस्त, वाकडी घाटावर रेती माफियांचा धुमाकूळ
– जीपीएस-ईटीपी नियंत्रण ढासळले
The गडविश्व
कुरखेडा, दि. २० : जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागातील कर्मचारी जिल्हा मुख्यालयात व्यस्त असताना, वाकडी-मोहोगाव येथील शासकीय रेती घाटावर नियमबाह्य उपसा सुरू असल्याची गंभीर चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. घाटावर प्रत्यक्ष देखरेखीचा अभाव निर्माण झाल्याने काही ठिकाणी जीपीएस प्रणाली व ई-टीपी तपासणीशिवायच रेती वाहतूक सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२६ चे उद्घाटन जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेमुळे महसूल विभागातील मोठा कर्मचारी वर्ग जिल्हा मुख्यालयात सहभागी झाला असल्याचे सांगितले जाते. परिणामी, घाटावरील नियंत्रण सैल झाल्याचे चित्र दिसत आहे.
नायब तहसीलदार राजकुमार धनबाते यांनी दूरध्वनीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘क्रीडा महोत्सवामुळे कर्मचारी मुख्यालयात आहेत. घाट बंद ठेवण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली होती.’ तथापि, प्रत्यक्षात घाटावर उपसा सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

शासनाने वाकडी घाट गरजू लाभार्थ्यांसाठी ६०० ते ६५० रुपये प्रति ब्रास रॉयल्टीवर निर्गमित केला आहे. मात्र, ई-टीपी पडताळणी व जीपीएस प्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने काही ट्रॅक्टर-ट्रॉलींवर जीपीएस प्रणाली नसतानाही रेती वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
यामुळे ‘जीपीएस नसेल तर ई-टीपी कशी?’ आणि ‘ई-टीपीशिवाय वाहतूक कशाच्या आधारे?’ असे सवाल उपस्थित होत आहेत. अनियंत्रित उपशामुळे शासकीय महसूल बुडीत जाण्याची तसेच पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाने तातडीने पर्यायी कर्मचारी व्यवस्था करून घाटावरील नियंत्रण कडक करावे किंवा आवश्यक असल्यास घाट तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here