The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०७ : धानकापणीच्या हंगामात महिलांचा जीव टांगणीला आला अशी भीतीजनक वेळ गुरुवारी सकाळी कुरखेडा तालुक्यातील चिखली गावात ओढवली. चैनलाल चैतू बसोना यांच्या शेतात धान कापणी करत असलेल्या महिला मजुरांना अचानक धानाच्या कडप्यांखाली लपलेला पाच फूट लांबीचा आणि सुमारे चार किलो वजनाचा विषारी घोणस साप (रसेल्स वायपर) दिसून आला. क्षणातच शेतात एकच गोंधळ उडाला आणि महिलांनी जीवाच्या आकांताने शेत सोडले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कुरखेडा रेंजचे क्षेत्र सहाय्यक एस. एल. कंकलवार आणि डोंगरे (गोटणगाव) यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक गोन्नाडे, दुधबडे, कुमरे, मेश्राम, गावडे आणि कु. ठीकरे यांची पथक घटनास्थळी दाखल झाले. गावातील दुधकुवर, पगाडे, गाडेगोने, पुसाम आणि सय्याम यांनीही रेस्क्यू कार्यात मोलाचे सहकार्य केले.
पथकाने अत्यंत काळजीपूर्वक आणि कौशल्याने सापाला विशेष साधनांच्या मदतीने पकडले. त्यानंतर त्याला खैरी नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक १५० मध्ये नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या सोडण्यात आले.
साप पकडताच महिलांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि पुन्हा कामाला लागल्या. “घोणस हा अत्यंत विषारी साप असून त्याचा दंश जीवघेणा ठरू शकतो. मात्र आमच्या टीमच्या त्वरित कारवाईमुळे कोणतीही दुर्घटना टळली,” असे क्षेत्र सहाय्यक एस. एल. कंकलवार यांनी सांगितले.
#thegdv #thegadvishva #thegadvishva #gadchirolinews #kurkhedanews














