कुरखेडा : ‘तो’ पुन्हा परतला, बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २५ : तालुक्यातील धमदीटोला परिसरात पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला चढविल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. काल (२४) रात्री घरामागे लघुशंकेसाठी गेलेल्या एका युवकावर बिबट्याने अचानक झडप घातली. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून सुदैवाने त्याचे प्राण वाचले.
सदानंद धरमदास उईके (वय ३२) असे जखमी युवकाचे नाव आहे. हल्ला होताच त्यांनी जोरदार आरडाओरड केल्याने कुटुंबीय व शेजारी तत्काळ मदतीला धावले. नागरिकांची चाहूल लागताच बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला. गस्तीवर असलेल्या वनविभागाच्या पथकाने जखमीला तत्काळ कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
गेल्या पाच-सहा दिवसांपासून धमदीटोला परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. यापूर्वी मका पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याला पिटाळून लावताना त्याने प्रतिहल्ला करून दोन युवकांना जखमी केले होते. तसेच एका शेतकऱ्याचे गायीचे वासरू ठार केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. रात्री आणि पहाटे घराबाहेर पडणेही धोकादायक ठरत असल्याने नागरिक भयभीत आहेत.
दरम्यान, रुग्णालयात भेट देऊन रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटील हरडे, माजी पंचायत समिती सभापती गिरीधर तितराम व माजी पंचायत समिती सदस्य धरमदास उईके यांनी जखमीची विचारपूस केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कवाडकर यांच्याकडून उपचारांची माहिती घेतली.
यावेळी संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत गोपूलवाड यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून बिबट्याला तातडीने पिंजऱ्यात जेरबंद करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली. तसेच जखमी युवकांसह जनावरांच्या नुकसानीबद्दल तात्काळ आर्थिक मदत देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
सलग हल्ल्यांमुळे बिबट्या अजूनही मोकाट असल्याची चर्चा गावभर सुरू असून वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.














