– लाखोंची होते उलाढाल, पोलीस प्रशासनाची बघ्याची भूमिका
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा (चेतन गहाने) दि. २६ : पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्याला झाडीपट्टी म्हणून ओळखले जाते. दंडार, तमाशा, गोंधळ या लोककला प्रकारातून झाडीपट्टी रंगभूमी जन्माला आली. इथल्या प्रेक्षकांनी झाडीपट्टी रंगभूमीला दिलेल्या कौलाने झाडीपट्टी रंगभूमी प्रगल्भ झाली असून दिवाळीची धामधूम संपताच आता मंडईला सुरुवात झाली आहे. या मंडईमध्ये झाडीपट्टी रंगभूमीची मनोरंजनाची साधने अत्यंत मर्यादित प्रमाणात उपलब्ध होतात. त्या कालावधीतच झाडीपट्टी रंगभूमीने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान पक्के केले मात्र सध्या या मंडईला वेगळे स्वरूप येत असल्याचे दिसून येत आहे.
मंडईच्या माध्यमातून नातेवाईक एकत्र येतात, मंडई ला जत्रेचे स्वरूपही मिळते मात्र याच मंडई ला आता अवैध धंद्याचे गालबोट लागल्याचे दिसून येत आहे. देव मंडईच्या नावावर अवैध कोंबडे बाजाराचा जुगार खेळला जात असून या माध्यमातून लाखोंची उलाढाल होतांना दिसते तर असे असतांनाही पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका दर्षावितानाही दिसून येत आहे.
आदिवासी बांधवाकडून दरवर्षी ध्वज हातात घेऊन प्रभात फेरी काढून नागरिकांना सुखी व समृद्धी राखण्याचे साकडे देव मंडईच्या माध्यमातून घातले जातात. निसर्गाला देव मानून निसर्गाची पूजा करणाऱ्या आदिवासी बांधवाकडून तसेच परिसरातील नागरिकांकडून हत्ती व घोडे असलेल्या मूर्तीची पूजा अर्चना यावेळी करण्यात येते. पण सध्या मंडईला अवैध कोंबडे बाजार लुडो जुगार याचे रूप आल्याचे दिसून येत आहे. खुलेआम अवैध कोंबडे बाजार व जुगार खेळाला जात असताना याला कोणाचा आशीर्वाद ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अवैध धंद्यांना आळा घालण्याकरिता पोलीस अधीक्षकांनी सबंधित परिसरातील पोलीस प्रशासनाला आदेश दिले आहेत मात्र असे असताना सबंधित विभाग गेंड्याची कातडी पांघरून मौन धरून बसल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवैधरित्या कोंबडे बाजार भरविल्या जात आहे. अशातच युवा वर्गात मोठ्या प्रमाणात या अवैध कोंबडे बाजाराच्या आहारी जात असल्याचे दिसून येत असून युवा पिढीच असल्या जुगाराच्या आहारी जात असल्यास संबंधित प्रशासन याच्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.
