The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. १९ : तालुक्यातील रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्र अद्याप सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. या पार्श्वभूमीवर आज १९ मे रोजी दुपारी १२ वाजता काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
शासकीय खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने आपले धान खाजगी व्यापाऱ्यांना कमी दराने विकावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
आदिवासी विकास महामंडळामार्फत (आविका संस्था) शासकीय आधारभूत धान खरेदी योजना राबविली जाते. मात्र, रब्बी हंगामातील धान काढून सुमारे १५ दिवस उलटून गेले तरीही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. परिणामी, खाजगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.
तातडीने सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करून खरेदी केंद्र सुरू करावे, या प्रमुख मागणीसाठी आंदोलन छेडण्यात आले आहे. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला.
या आंदोलनाचे नेतृत्व तालुका काँग्रेस अध्यक्ष जिवन पाटील नाट, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटील हरडे, माजी जि.प. सदस्य प्रभाकर तूलावी, माजी सभापती गिरीधर तितराम, माजी उपसभापती श्रीराम दूगा, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रांजल धाबेकर यांनी केले. त्यांच्यासह दामोदर वट्टी, तुकाराम मारगाये, सुरेश गावतूरे, उस्मान खान, मोहन कूथे, धर्मदास ऊईके, भावेश मुंगणकर, अनिल ठाकरे, पुंडलिक निपाणे, मंगेश वालदे, दिवाकर मारगाये, तेजराम सहारे, रेशीम माकडे, विठ्ठल प्रधान, हरिदास नाकतोडे, विनोद माकडे, अगरसिंग खडाधार, आनंदराव जांभूळकर, संदेश कोटागंले, अशोक डोंगरवार, निलकंठ आलाम, रूपचंद आळे, छगन आडील, गजानन घुगवा, राहुल कपूर, मदन वट्टी, नानाजी वालदे, अरुण ऊईके, रोहित ढवळे, राजेश आत्राम, मोहन नंदेश्वर, विजय कूथे, दिनकर माकडे आणि इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
