कुरखेडा : नागमोडी नाली बांधकाम आणि रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात नागरिक आक्रमक

398

– आंदोलनाचा इशारा
The गडविश्व
कुरखेडा, दि.०५ : नागमोडी नाली बांधकाम आणि रस्त्यावरील अतिक्रमणाला अभय दिले जात असल्याच्या निषेधार्थ कुरखेड्यातील नागरिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी अतिक्रमण तत्काळ हटविण्याची आणि नियमानुसार रस्ता रहदारीसाठी मोकळा करून नाली सरळ रेषेत बांधण्याची मागणी केली आहे. या संदर्भात मुख्याधिकारी पंकज गावंडे (नगर पंचायत, कुरखेडा) यांना निवेदन सादर करण्यात आले असून, मागणी मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
दोषपूर्ण नाली बांधकामाविरोधात मागणी प्रभाग क्रमांक ९ मधील मुख्यमार्गालगत निना पेट्रोल पंपजवळील नाली बांधकाम दोषपूर्ण होत असल्याने ते त्वरित थांबवून दोष दूर करण्याची मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. गांधी वार्डातील (प्रभाग क्रमांक ९) रहिवाशांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या असून, मुख्याधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीचा प्रश्न

या भागात मागील वर्षभरापासून प्रस्तावित नाली बांधकाम प्रलंबित होते. आता जेथे हे काम सुरू झाले आहे, तेथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण झाल्यामुळे १२ मीटरचा रस्ता अरुंद झाला आहे. नाली बांधकाम करताना अतिक्रमण हटवले जात नसल्यामुळे अतिक्रमणधारकांना झुकते माप दिले जात असून, नाली नागमोडी पद्धतीने बांधली जात आहे. नगर पंचायत प्रशासन अतिक्रमण करणाऱ्यांना अभय देत दोषपूर्ण बांधकाम करून १२ मीटर रस्ता कमी करण्याचे काम करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या परिसरात बँक, दवाखाने, मेडिकल स्टोअर्स, खरेदी केंद्रे, पॅथोलॉजी लॅब, भोजनालये आणि संगणक प्रशिक्षण केंद्रे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाल्याने भविष्यात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

पूर्वीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष

२०१८ मध्ये या मार्गावरील नाली बांधकामासंदर्भात रहिवाश्यांनी लेखी तक्रार केली होती. मात्र, त्यावर नगर पंचायत प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. तसेच, येथे पक्के बांधकाम करून झालेले अतिक्रमण अद्याप काढण्यात आलेले नाही. सद्यस्थितीत सुरू असलेले नाली बांधकाम लेआउटमधील १२ मीटर मंजूर रस्त्यावर केले जात आहे. नियमानुसार सार्वजनिक रस्ते नगर पंचायतीच्या मालकीचे असतात. मात्र, नगर पंचायत प्रशासन हेतुपुरस्सर अतिक्रमण हटविण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

नागरिकांचा इशारा – अन्यथा उपोषण

निवेदन मिळताच नगर पंचायत प्रशासनाने प्रभाग क्रमांक ९ मधील निना पेट्रोल पंपजवळील दोषपूर्ण नाली बांधकाम त्वरित थांबवावे आणि १२ मीटर रस्ता मोकळा करून नियमानुसार बांधकाम करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, येथील रहिवासी उपोषणाचा मार्ग अवलंबतील, असा इशारा दिला आहे.
यावेळी आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला नगर पंचायत प्रशासन जबाबदार असेल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

सदर निवेदनावर डॉ. भैयालाल राऊत, सौ. गीता कोटांगले, डॉ. मनोज मार्गिया, डॉ. ते. ना. बुद्धे, वामन कोटांगले, राजू टेंभुर्णे, सौ. सुनंदा गावळे, देवेंद्र जगन्नाथ मेश्राम, शबाना रफिक शेख, दीपक देविदास चहांदे, सुरज बंडूजी बोरसरे, निलेश पांडुरंग चंदनखेडे, बालकृष्ण ठाकरे, विनायक नक्षुलवर, पदमा दशरथ मोटघरे, मुरलीधर देशमुख, राजेश प्रधान, देविदास चहांदे, रमेशजी बगमारे, पुनाजी भाकरे आणि इतर नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here