खड्डेमय रस्त्यांविरोधात पत्रकार संघटना आक्रमक ; एटापल्लीमध्ये बेमुदत साखळी उपोषण

29

खड्डेमय रस्त्यांविरोधात पत्रकार संघटना आक्रमक ; एटापल्लीमध्ये बेमुदत साखळी उपोषण
The गडविश्व
एटापल्ली, दि. ०९ : तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची भीषण दुर्दशा आणि प्रशासनाच्या दीर्घकाळ चाललेल्या उदासीनतेविरोधात एटापल्ली पत्रकार संघटना आक्रमक झाली असून आज, सोमवार ९ फेब्रुवारी २०२६ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एटापल्ली कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनामुळे एटापल्ली तालुक्यातील रस्ते दुरुस्तीचा ज्वलंत प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
एटापल्ली–देवदा–गडचिरोली हा जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग, तसेच एटापल्ली–जारावंडी आणि एटापल्ली–हेडरी–गट्टा हे प्रमुख रस्ते सध्या पूर्णतः खड्डेमय व जीर्ण अवस्थेत आहेत. या मार्गांवरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी, रुग्ण आणि शासकीय कर्मचारी प्रवास करतात. मात्र रस्त्यांची अवस्था इतकी दयनीय आहे की लहान-मोठे अपघात नित्याचे झाले असून, काहींना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
विशेषतः गर्भवती महिला, नवजात बालके, वृद्ध आणि गंभीर आजारी रुग्णांना तालुका व जिल्हा रुग्णालयात नेताना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. खड्डेमय रस्त्यांमुळे रुग्णवाहिकेतच रुग्णांची प्रकृती खालावत असल्याच्या घटना समोर आल्याने नागरिकांच्या जीविताशी सुरू असलेला हा धोकादायक प्रकार तात्काळ थांबवावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
या संदर्भात पत्रकार संघटना व नागरिकांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच उपविभागीय प्रशासनाकडे यापूर्वीच लेखी निवेदने सादर करण्यात आली होती. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी संबंधित विभागास अर्ज देऊन दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र या कालावधीत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आजपासून सुरू झालेले हे साखळी उपोषण बेमुदत स्वरूपाचे असून, रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती व नुतनीकरणाचा ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, आता तरी शासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #etapalli

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here