गडचिरोलीत उद्या पदवीधरांसाठी रोजगार मेळावा ; ४० नामांकित कंपन्यांचा सहभाग

906

– गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे आयोजन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ :  गडचिरोली जिल्ह्यातील पदवीधर बेरोजगारांसाठी गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने उद्या शुक्रवार, 28 मार्चला सकाळी 10 ते 6 या वेळेत येथील महाराजा सेलिब्रेशन हॉल, धानोरा रोड येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात महाराष्ट्रातील 40 नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार असून गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे 10 हजारांवर बेरोजगार पदवीधर यामध्ये सहभागी होणार असल्याची शक्यता आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सदर मेळाव्यात निर्मिती, आय.टी. ऊर्जा, ऑटोमोबाईल, बँकिंग क्षेत्रातील राज्यभरातील सुमारे 40 नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. पदवी शिक्षण घेत असलेले आणि पदवीधर या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. उमेदवारांचे शिक्षण ज्या क्षेत्रातील आहे, त्या क्षेत्राशी संबंधित कंपनी उमेदवारांच्या मुलाखती घेतील. थेट मुलाखतीच्या माध्यमातून त्याच ठिकाणी उमेदवारांची निवड करून त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे.
सदर रोजगार मेळाव्यात गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदवीधर बेरोजगार सहभागी होऊ शकतील. आतापर्यंत सुमारे तीन हजारांवर पदवीधरांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. ज्यांनी अद्याप ऑनलाईन नोंदणी केली नाही ते सुद्धा कार्यक्रमस्थळी येऊन आपली नोंदणी करू शकतील. उमेदवारांनी 28 मार्च रोजी नियोजित ठिकाणी शैक्षणिक पात्रतेचे सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित राहणे बंधनकारक आहे. संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित कंपनीना देण्यात आलेल्या क्रमांकाचे टोकण उमेदवारांना देण्यात येईल. त्यानुसार, संबंधित क्रमांकाच्या दालनात त्यांची मुलाखत होईल. निवड झालेल्या उमेदवारांना मेळाव्यातच नियुक्तीपत्र देण्यात येईल. या मेळाव्यात जास्तीत जास्त पदवीधर बेरोजगारांनी सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here