गडचिरोलीत ३ लाख कोटींची गुंतवणूक ; १ लाख रोजगारांची निर्मिती
-‘गडचिरोली आता महाराष्ट्राचे प्रवेशद्वार’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : गडचिरोली जिल्हा आता केवळ राज्याचा शेवटचा जिल्हा राहिलेला नसून, तो महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाचे प्रगत ‘प्रवेशद्वार’ ठरणार आहे. जिल्ह्यातील खनिज संपत्ती, औद्योगिक क्षमता आणि स्थानिक तरुणांचे कौशल्य यांच्या बळावर येथे ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून त्यातून सुमारे १ लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
गडचिरोली जिल्ह्यातील अडपल्ली येथे गोंडवाना विद्यापीठ व लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेड यांच्या सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (PPP) स्थापन करण्यात आलेल्या विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था (UATI) च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, तसेच लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत गडचिरोलीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शासनाने जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्ध प्रयत्न केले. एकेकाळी माओवादाने ग्रस्त आणि अतिमागास जिल्हा म्हणून ओळख असलेला गडचिरोली आज विकासाच्या मुख्य प्रवाहात ठामपणे उभा राहिला आहे. पोलीस दलाच्या शौर्यपूर्ण कारवाया आणि शासनाच्या लोकाभिमुख धोरणांमुळे जिल्हा लवकरच पूर्णतः माओवादमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “आता गडचिरोलीतील तरुणांच्या हातात शस्त्र नव्हे, तर आधुनिक शिक्षण, कौशल्य आणि रोजगार असतील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्योग आणि शिक्षण यांचा प्रभावी संगम साधणारी विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था (UATI) ही राज्यासाठी एक आदर्श संकल्पना असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री म्हणाले की, उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवरच तयार व्हावे, या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. लॉयड्स मेटल्सने यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी कंपनीचे विशेष कौतुक केले. या संस्थेत विद्यार्थ्यांना केवळ दर्जेदार शिक्षणच नव्हे, तर निवास व प्रवासाची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
भविष्याचा वेध घेणाऱ्या अभ्यासक्रमांविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, येथे मायनिंग, मेटलर्जी, संगणक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आदी आधुनिक अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. विशेषतः येथील ‘लँग्वेज लॅब’ मुळे स्थानिक विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढत असून, अवघ्या चार महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर एका विद्यार्थिनीने इंग्रजीत प्रभावी संवाद साधल्याचे उदाहरण त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
कार्यक्रमानंतर गडचिरोली जिल्ह्यातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने गडचिरोली पोलीस विभागाला ३० स्कॉर्पिओ वाहने, २ बस आणि २ मोटारसायकली असा एकूण ३४ वाहनांचा ताफा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून वितरित करण्यात आला. तसेच गडचिरोली पोलीस विभागाच्या वाढीव विश्रामगृहाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.














